लॉकडाऊनच्या भीतीने खरेदीसाठी गर्दी
प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे सारेजण खरेदीच्या मागेच लागले आहेत. रेशनधारकही रेशन घेण्यासाठी धडपडत असताना दिसत आहेत. शनिवारी रेशन दुकानांसमोर मोठय़ा रांगा लागल्या होत्या. सोशल डिस्टन्स पाळतच ही खरेदी करण्यात आली. असे असले तरी लॉकडाऊनमुळे खरेदी करण्यासाठी साऱयांची धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊन सोमवारपासून होणार म्हणून बाजारपेठेत मोठी गर्दी उडाली होती. मात्र, जनतेला लॉकडाऊन असला तरी खरेदीसाठी अजूनही अवधी आहे. तरीदेखील साऱयांचीच खरेदी करण्यासाठी धडपड सुरू असताना दिसत होती. रेशन घेण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रेशन दुकानदारांना दिवसभर रेशनचे वितरण करावे लागत होते. भर उन्हातच या सर्वांनी रांगा लावल्या होत्या.
यावेळी रेशनही वेळेत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याचबरोबर सर्वांना रेशन द्यावे, अशी सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी रेशन देण्यासाठी सकाळीच दुकाने उघडून रेशन वितरण सुरू केले होते. गोंधळी गल्लीसह शहरातील इतर दुकानांसमोरही गर्दी दिसून येत होती.