शेतकऱयांची मामलेदारांकडे तक्रार : मानस खाली करण्याची मागणी
प्रतिनिधी / फोंडा
धारजोवाडा-कुंडई येथील चिखलपाईण खाजन शेती मत्स्य उत्पादनासाठी बुडविण्यात आल्याने येथील शेतकऱयांची सुपिक शेती कायमची बुडाली असून आता बांधावरील नारळाचे कवाथे व इतर बागायतीला खाऱया पाण्यामुळे धोका निर्माण झाला आहे. भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढून येथील काही लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचत असून येण्याजाण्याची पायवाटही बुडाली आहे अशी तक्रार येथील शेतकऱयांनी केली आहे.
चिखलपाईण खाजन शेतीशी संबंधीत जगन्नाथ काशिनाथ नाईक या शेतकऱयाने या मानशीमुळे आपल्याला मोठय़ाप्रमाणात नुकसान सोसावे लागत असल्याची लेखी तक्रार फोंडा मामलेदार व कुंडई पंचायतीला दिली आहे. मत्स्य उत्पादनासाठी शेतीत भरण्यात आलेले पाणी त्वरीत खाली करुन आमची पारंपरिक शेती पूर्ववत लागवडीसाठी उपलब्ध करुन द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मत्स्य उत्पादनासाठी तयार केलेली मानस बेकायदेशीर असून काही मोजक्याच शेतकऱयांना हाताशी धरुन हा प्रकार चालल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गेली तीन वर्षे चिखलपाईन खाजनशेती मत्स्य उत्पादनासाठी बुडविण्यात आली आहे. भरतीच्यावेळी आपल्या बागायतीमध्ये पाणी शिरुन कवाथे व अन्य झाडांची हानी झाली आहे. शिवाय घराकडे ये जा करण्याची पायवाटही पाण्याखाली गेल्याचे त्यांनी सांगितले.
मत्स्य उत्पादनासाठी शेतकरी संघटनेची परवानगी नाही ः अध्यक्ष
यासंबंधी चिखलपाईण खाजन शेती संघटनेचे अध्यक्ष विजेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही मानस बेकायदेशीर असल्याचे सांगितले. शेतकरी संघटनेने त्याला कुठलीच अधिकृत परवानगी दिलेली नाही. ज्या शेतकऱयांनी शेती करणे बंद केले आहे, अशा काही लोकांना हाताशी धरुन हा प्रकार चाललेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरु असून यासंबंधी आपण फोंडा मामलेदारांकडे तक्रारही केली आहे. शेतीत भरलेले पाणी 15 एप्रिलपर्यंत खाली करण्यास आपण मानसवाल्यांना बजावले होते. पण ते शेतकरी संघटनेला जुमानत नाहीत. गावातील बहुतांश शेतकरी भातशेती लागवडीसाठी तयार आहेत. पण शेती बुडवली गेल्याने सर्वांचाच नाईलाज झालेला आहे. मामलेदारांकडे तक्रार दिल्याने त्यांनी पोलीस सुरक्षा पुरवून शेतीमधील पाणी खाली करण्याचा आदेश दिले आहे. त्यानूसार आज सोमवार 19 रोजी तलाठय़ांमार्फत पाहणी केली जाणार आहे. हा पाहणी अहवाला मामलेदारांना सादर केल्यानंतर पुढील कृती ठरेल, अशी माहिती विजेश नाईक यांनी दिली.