केंद्र सरकारचे प्रयत्न : आयी, तुळस गावांची निवड
संतोष सावंत / सावंतवाडी:
दोडामार्ग तालुक्यातील आयी व वुंगर्ले तालुक्यातील तुळस या दोन गावात पॉटर व्हिलेजची संकल्पना साकारणार आहे. यासाठी या दोन गावांचे प्रस्ताव महाराष्ट्र राज्य हस्तकला सेवा केंद्र विभाग कोल्हापूर यांनी तयार केले आहेत. जिल्हाधिकारी आणि राज्य हस्तकला विभागाची बैठक घेऊन या गावांना पॉटर व्हिलेज म्हणून मान्यता दिली जाणार आहे.
गोवा व महाराष्ट्र या दोन राज्यांच्या सीमेवर आयी गाव वसला आहे. या गावात कुंभारकाम मोठय़ा प्रमाणावर चालते. त्याचबरोबर तुळस गावही समाविष्ट आहे. आयी गावावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.
पॉटर व्हिलेज संकल्पना
सावंतवाडी संस्थानला कलेचा वारसा आहे. सावंतवाडी लाकडी खेळण्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. याच धर्तीवर केंद्र सरकारने पॉटर व्हिलेजची संकल्पना हाती घेतली आहे. त्या दृष्टीने केंद्र सरकारने देशातील आठ राज्यांची निवड केली आहे. त्यात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानचा समावेश आहे. त्यात सिंधुदुर्गातील आयी व तुळस या दोन गावांचा समावेश आहे.
कुंभार समाजाची वस्ती
कोकणात कुंभार समाजाची वस्ती मोठय़ा प्रमाणात आहे. सोलापूर दुसऱया क्रमांकावर आहे. सिंधुदुर्गात सोळा हजार कुंभार बांधव आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले, मालवण, कणकवलीत कुंभार समाजाची गावे आहेत. कुंभार बांधव मातीच्या विटा, गणेशमूर्ती, मातीची भांडी, ग्लास, शेगडी अशा वस्तू बनवितात. तुळस व आयी गावात जवळपास 300 ते 350 कुंभार कारागीर कार्यरत आहेत. ही दोन गावे आदर्श कुंभार गाव म्हणून विकसित होत आहेत. या गावांना शासन स्तरावर दर्जा देण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत.
आदर्श कुंभार गावांचा प्रस्ताव तयार
राज्य हस्तकला सेवा केंद्र विभागाचे सहाय्यक संचालक चंद्रशेखर सिंघ यांनी सांगितले, देशात केंद्र सरकारने आदर्श कुंभार गावे करण्याचे ठरविले आहे. जेणेकरून त्या गावांचा पर्यटनदृष्टय़ा विकास होईल व हस्तकलेला दर्जा प्राप्त होईल. केंद्र सरकारकडे आम्ही आयी व तुळस गावांचा प्रस्ताव तयार करून पाठविला आहे. येत्या काही दिवसात जिल्हाधिकाऱयांसमवेत बैठक होऊन अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या दोन गावातील कुंभार कारागिरांना कुशल बनविले जाणार आहे.
कुंभार समाज मंडळाचा पुढाकार
जिल्हय़ात कुंभार बांधवांनी संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ स्थापन केले आहे. या मंडळाचे अध्यक्ष प्रा. गणपत शिरोडकर यांनी सांगितले, कुंभार समाज जिल्हय़ातील आठही तालुक्यात विखुरला आहे. कुंभार कारागिरांनी अत्याधुनिक पद्धतीने उद्योग-व्यवसाय चालवावा, यासाठी चाकेवाटप कार्यक्रम आम्ही घेत आहोत. मातीपासून बनविलेली भांडी व वस्तुंना मागणी वाढली आहे. आयी व तुळस ही गावे आदर्श कुंभार गावासाठी निवडली हे आमचे भाग्यच आहे. केंद्र व राज्य सरकारने हस्तकला संकल्पना आणून आम्हाला एक नवा स्रोत उपलब्ध करून दिला आहे. आयी व तुळस गावात आताही कुंभार कारागिरांचे कारखाने पाहायला मिळतात. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत शेडेपुलकर, कोकण विभागीय कार्याध्यक्ष विलास गुडेकर, अनिल शेटकर, काशिनाथ खडपकर, सुहास पिकुळेकर आदींनी जिल्हा व प्रदेश कुंभार समाज मंडळाच्या पदाधिकाऱयांनी आयी व तुळस गावांच्या पॉटर व्हिलेज संकल्पनेबाबत समाधान व्यक्त केले आहे.