कुडचडे भाजप मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत यांनी व्यक्त केलेला विश्वास
प्रतिनिधी /कुडचडे
कुडचडेत आगामी निवडणुकीसाठी विद्यमान आमदार तसेच अन्य इच्छुकांकडून जोरदार तयरी सुरू आहे. यासंबंधी कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत यांची भेट घेऊन संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, कुडचडेत कोणीही कितीही हल्लाबोल केला, तरी यंदाही भाजपचे आमदार व मंत्री नीलेश काब्राल हे भरघोस मतांनी निवडून येणार हे निश्चित आहे.
प्रत्येक वेळी विधानसभा निवडणुकीच्या वेळी कुडचडेत निर्माण होणारी परिस्थिती आपण बघितली आहे व त्यात मी मी म्हणणारे बरेच बघितले आहेत. पण मागील दोन्ही वेळा जेव्हा कुडचडे मतदारसंघाचा निवडणूक निकाल जाहीर झाला तेव्हा कुडचडेच्या लोकांची पसंती काय होती ते पूर्ण गोव्यातील जनतेने बघितलेले आहे. यावेळीही तसेच घडणार यात कोणतीच शंका नाही. कारण काब्राल यांनी केलेल्या विकासकामांवर विरोधकांनी कितीही पांघरूण घातले, तरी त्या पांघरूणाचा काहीच फायदा होणार नाही, असे सावंत यांनी ठामपणे सांगितले.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे सरकार असताना दक्षिण गोव्यातील त्यांचे उमेदवार नरेंद्र सावईकर यांना मोठी हार पत्करावी लागली होती याकडे लक्ष वेधले असता सावंत यांनी सांगितले की, त्यावेळी वातावरण एकदम वेगळे होते. तरीही भाजपचा उमेदवारच निवडून येणार असे वाटत होते. कारण त्याअगोदर जेव्हा सावईकर पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा त्यांनी बरीच कामे केली होती व बऱयाच जणांना त्याचा फायदा झाला होता. तरीही लोकांनी परिवर्तनाचा त्यावेळी जो निर्णय घेतला त्यासंबंधी आपण काही सांगू शकत नाही. पण यावेळी कुडचडेत विरोधक म्हणून जे उतरले आहेत त्यापैकी एक कुडचडेतील लोकांच्या दृष्टिकोनातून भाजप कार्यकर्ता होता. पण आपण मुद्दाम सांगू इच्छितो की, ही जी व्यक्ती आमदारांच्या विरोधात उभी ठाकली आहे ती व्यक्ती प्रत्यक्षात आमदारांच्या सोबत कधीच नव्हती. याची जाणीव लोकांनी ठेवावी व दिशाभूल होऊ देऊ नये, असे ते म्हणाले.
कुडचडेत कितीही विरोधक आले, मग त्यात माजी आमदार असो वा काँग्रेस, मगो, आप, रिव्हॉल्युशनरी गोवन्स असो, त्याचा परिणाम काब्राल यांच्यावर होणार नाही. गेल्या वेळी ते साडेनऊ हजार मतांनी निवडून आले होते. त्यापेक्षाही जास्त मतांनी कुडचडेतील जनता यावेळी त्यांना निवडून देईल. मगो व भाजपच्या युतीसंदर्भात सुदिन ढवळीककर यांनी 12 जागा मागितल्या आहेत. त्यावर पक्षपातळीवर निर्णय घेण्यात येईल. पण याखेपेलाही कुडचडेत नीलेश काब्राल यांच्या माध्यमातून भाजपचेच कमळ फुलेल, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.