कांही जणांवर गुन्हे दाखल : जिल्हा पोलीसप्रमुखांची कुडचीला भेट
वार्ताहर/ कुडची
कुडचीत कोरोनाचे चार रुग्ण आढळले असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी आलेल्या आशा कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी घडली. याबाबत काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी सहकाऱयांसह कुडचीला भेट दिली.
सध्या कुडचीतील 41 जण होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत. शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊनमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. आज आशा कार्यकर्त्या शहरात सर्वेक्षणासाठी फिरत होत्या. त्याबाबत आरोग्य खाते अथवा संबंधितांनी जनजागृती करून कोणतीही पूर्वसूचना दिलेली नव्हती. आशा कार्यकर्त्या सर्वेक्षणासाठी आल्या असता त्यांच्यावर हल्ला झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध खात्यातील अधिकारी कुडची येथे तळ ठोकून आहेत. आशा कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची माहिती मिळताच अधिकाऱयांनी तातडीने धाव घेतली. रायबागचे तहसीलदार चंदकांत बजंत्री, अथणीचे पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश, कुडचीचे पोलीस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. बाणे, कुडची समुदाय आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कलट्टी, कुडची नगर परिषदेचे मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांच्यासह अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आशा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याप्रकरणी काही जणांवर गुन्हे नोंदविले आहेत.
जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट
हल्ल्याची माहिती समजताच जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी कुडची येथे सहकाऱयांसह भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून त्यांनी अधिकाऱयांना उपयुक्त सूचना केल्या. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा पोलीसप्रमुख निंबरगी यांनी, कोरोनाला रोखण्यासाठी शासनासह विविध खात्याचे अधिकारी, कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून त्यांच्यावर हल्ले करणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.