कोरोनाबाधित कुटुंबीयांच्या संपर्कात आल्याने लागण : जिल्हय़ातील बाधितांची संख्या 45 वर : सीलडाऊन कडक करणार
प्रतिनिधी/वार्ताहर/ बेळगाव, कुडची
गत चार दिवसांपासून जिल्हय़ात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये समाधान होते. कुडचीतही 16 एप्रिल रोजी 7 रुग्ण आढळून आल्याने येथील आकडा 17 वर पोहचला होता. तर बुधवार दि. 21 रोजी येथील कोरोनाबाधित महिला बरी झाल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. असे असतानाच शुक्रवार दि. 24 रोजी कुडची येथे दोन मुलांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या येथील कोरोनाबाधितांचा आकडा 19 वर पोहचला आहे. यातील दोघे कोरोनामुक्त झाले आहेत.
कुडची येथील दहा वर्षांची मुलगी व पंधरा वषीय मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कुडची येथील एका 44 वषीय इसमाला कोरोनामुक्त झाल्याने घरी जाऊ देण्यात येत असतानाच त्याच्याच लेकीला मात्र कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच पंधरा वर्षीय मुलाला त्याच्या कुटुंबातीला सदस्यांपासून बाधा झाली आहे.
शुक्रवारी सकाळच्या हेल्थ बुलेटिनमध्ये यासंबंधीची माहिती देण्यात आली होती. सायंकाळच्या बुलेटिनमधील माहितीनुसार एका दिवसांत राज्यातील 29 जणांचे स्वॅब तपासणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कुडची येथील दोन मुलांचा समावेश आहे. बेळगाव जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर पोहोचली असून राज्यात बेळगाव अद्याप तिसऱया क्रमांकावरच आहे.
वैद्यकीय कर्मचाऱयांचेही डोळे पाणावले
रुग्ण क्रमांक 150 च्या संपर्कातून कुडची येथील दहा वषीय मुलीला तर रुग्ण क्रमांक 148 च्या संपर्कातून पंधरा वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. या दोघा जणांना गुरुवारी मध्यरात्री सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले असून लहान मुलांना आणताना वैद्यकीय कर्मचाऱयांचेही डोळे पाणावले होते.
1 एप्रिल रोजी कुडची येथील 44 वषीय इसमाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्याचा स्वॅब तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने शुक्रवारी दुपारी त्याला घरी जाऊ देण्यात आले. मात्र, गुरुवारी मध्यरात्री त्याच्या दहा वषीय मुलीला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या इसमाची पत्नी व मुलालाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनामुक्त रुग्णाला निरोप
विलगीकरण कक्षातून घरी पाठविताना टाळय़ा वाजवून डॉक्टरांनी त्याला निरोप दिला. यावेळी बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी उपस्थित होते. घरी पाठविण्यापूर्वी त्याला आरोग्य रक्षणासाठी काय करावे व काय करू नये, याच्या सूचना देण्यात आल्या. तो पूर्णपणे बरा झाल्यामुळे त्याला घरी पाठविण्यात आल्याचे बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी सांगितले.
आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या तिघा जणांना घरी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी चौथ्या कोरोनामुक्त इसमाला घरी जाऊ देण्यात आले. सरकारच्या मार्गसूचीनुसार चौघा जणांना विलगीकरण कक्षातून घरी पाठविण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचे डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी सांगितले.
याबरोबरच कुडचीतील सीलडाऊन अंशतः कमी करताना डोअर टू डोअर किराणा वस्तूंची सेवा देणे, बँका, पेट्रोलपंप अशी सेवा सुरू होती. सीलडाऊनची अंमलबजावणीही कडक सुरू होती. रुग्णसंख्या जैसे थेच असतानाच शुक्रवार 24 रोजी येथील एक मुलगा आणि एका मुलगीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. सदर दोन्ही मुलांना प्रशासनाने खबरदारी घेताना यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले होते.
सध्या कुडची येथे 90 जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 300 हून अधिक जणांना वेगवेगळय़ा ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले आहे. याठिकाणी त्यांची वरचेवर तपासणी करण्यात येत असून कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
मोबाईल क्लिनिकचे उद्घाटन
कर्नाटक परिवहनच्या बसमध्ये निर्माण केलेल्या मोबाईल क्लिनिकचे उद्घाटन येथील सरकारी दवाखान्यासमोर पोलीस उपअधीक्षक एस. व्ही. गिरीश यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार चंद्रकांत बजंत्री, कुडची आरोग्य केंद्र वैद्याधिकारी डॉ. सतीश कलट्टी, मुख्याधिकारी एस. ए. महाजन यांच्यासह अन्य अधिकाऱयांची उपस्थिती होती. कुडची येथील वाढती कोरोनाबाधितांची संख्या, होमक्वारंटाईन आणि क्वारंटाईनची वाढती संख्या याची दखल घेत सदर मोबाईल क्लिनिकची सोय करण्यात आली आहे. यामधून 24 तास सेवा पुरविण्यात येणार असून यासाठी आवश्यक साहित्य, औषधे, कोरोना टेस्टिंग व बेडची सोय आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित अधिकाऱयांनी केले आहे.
रमजान-सामूहिक नमाज पठणला बंदी
पवित्र रमजान सणाला प्रारंभ होत आहे. मात्र कोरोना विषाणू फैलावाच्या भीतीने आणि खबरदारी म्हणून सामूहिक नमाज पठणला प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. कुडची येथील मशिदांमध्ये तिघांनाच जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी सदर तिघांची नावे आणि त्यांचे फोटो पोलिसांकडे देणे बंधनकारक आहे. तिघांपेक्षा अधिक जण आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच मशिदीवरील स्पिकरही बंद ठेवावेत, अशी सूचना पीएसआय शिवराज बरीगौड यांनी येथे आयोजित केलेल्या बैठकीत केली.