मित्रांसह महाबळेश्वरहून परतताना उत्तुरनजीक दुर्घटना : अन्य एक गंभीर
प्रतिनिधी / उत्तुर / कुडाळ:
गुरुवारी पहाटे उत्तुर-निपाणी मार्गावर उत्तुरनजीक कार उलटून झालेल्या अपघातात कुडाळ शहरातील रोहित रमाकांत कुडाळकर (24 रा. खालची कुंभारवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. तर, जगन्नाथ पेडणेकर हा गंभीर जखमी झाला आहे. महाबळेश्वर येथे फिरून माघारी परतताना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. कारने तीन कोलांटय़ा मारल्या. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. रोहितच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुडाळकर कुटुंबियांसह शहरावर शोककळा पसरली.
नेरुर (ता. कुडाळ) येथील ओंकार मंगेश वालावलकर (वय 24, रा. लक्ष्मीवाडी) हा आपल्या भावाच्या मालकीची क्रेटा कार घेऊन मित्र रोहित कुडाळकर, जगन्नाथ पेडणेकर (वय 30, रा. कुडाळेश्वरवाडी), सायल परब (वय 29, रा. नाबरवाडी ता. कुडाळ), रघुनाथ कुंभार (वय 30, रा. कुंभारवाडी) हे सर्व महाबळेश्वर येथे फिरायला गेले होते. माघारी येत असताना उत्तुरनजीक आले असता, चालकाचा कारवरील ताबा सुटला. कारचा वेग एवढा होता की, कारने तीन कोलांटय़ा घेतल्या. या अपघातात रोहित कुडाळकर जागीच मृत्युमुखी पडला, तर जगन्नाथ पेडणेकर गंभीर जखमी झाला. रघुनाथ उर्फ रोहन कुंभार किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत, तर ओंकार वालावलकर याला फारशी दुखापत झाली नाही.
कुडाळमधील नागरिक घटनास्थळी रवाना
अपघाताचे वृत्त समजताच आजरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच कुडाळमध्ये घटना समजताच सुशिल चिंदरकर, राजू गवंडे, शेखर कुंभार, संदीप कुंभार, राम राऊळ, रामदास मांजरेकर, संदीप मांजरेकर यांच्यासह स्थानिक नागरिकांनी उत्तुर येथे धाव घेत जखमींची विचारपूस केली.
रोहित एकुलता एक
रमाकांत कुडाळकर यांना रोहित हा एकुलता एक मुलगा. रोहितच्या पश्चात आई व वडील असा परिवार आहे. ते मोलमजुरी करतात. मुलाच्या अपघाती निधनामुळे त्यांचा आधार हरपला आहे.
मृतदेह ओरोस येथील शवागृहात
आजरा पोलिसांनी अपघातानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. रोहितचे काका व अन्य नातेवाईक मुंबई येथून येणार असल्याने मृतदेह सिंधुदुर्गनगरी येथील शवागृहात ठेवण्यात आला. अपघाताची नोंद पोलिसात झाली असून पुढील तपास उत्तूर पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.