494 जागांसाठी 1087 उमेदवार रिंगणात : सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात 66 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. एकूण 494 जागांसाठी 1087 उमेदवार निवडणूक रिंगणात असून 207 मतदान केंद्रांवर 1 लाख 1 हजार 333 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही निवडणूक शिवसेना व भाजपने प्रतिष्ठेची केल्याने जिल्हय़ात बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत. 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी 50,269 महिला, तर 51,064 पुरुष असे 1 लाख 1 हजार 333 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्हय़ात 207 मतदान केंद्रे
जिल्हय़ातील 207 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये वैभववाडी तालुक्यात 28, कणकवली पाच, देवगड 59, मालवण 19, कुडाळ 21, वेंगुर्ले सहा, सावंतवाडी 54, दोडामार्ग नऊ याप्रमाणे मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
अटीतटीच्या लढती
600 पैकी 106 जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने या जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे आता 494 जागांसाठी प्रत्यक्षात 1087 उमेदवार रिंगणात आहेत. 1087 उमेदवार 226 प्रभागात आपले राजकीय नशीब आजमावत आहेत. येथे अटीतटीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. यातील अनेक ठिकाणी एकास एक याप्रमाणे भाजप विरुद्ध महाविकास आघाडी, तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे तिरंगी लढती होणार आहेत.
सकाळी 7.30 पासून मतदानाला प्रारंभ
सकाळी 7.30 वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान मुदत आहे. सायंकाळी मतदान संपल्यानंतर सर्व मतदान यंत्रे त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये आणली जाणार आहेत. 18 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तहसील कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
प्रशासन सज्ज
निवडणूक अनुषंगाने नियुक्त कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच 295 मतदान यंत्रांचे वाटप आठही तालुक्मयात करण्यात आले आहे. यात वैभववाडी 40, कुडाळ 40, सावंतवाडी 70, मालवण 30, देवगड 80, दोडामार्ग 15, वेंगुर्ले 10 व कणकवली 10 अशाप्रकारे समावेश आहे.