भाजीपाला-किराणा सामानाच्या ट्रकमधून छुपी वाहतूक : साडेपंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त
वार्ताहर / कुडाळ:
भाजीपाला व अन्य किराणा सामान वाहतूक करणाऱया ट्रकमधून छुप्या पद्धतीने कुडाळ येथे आणलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ एका छोटा हत्ती टेम्पोमध्ये भरत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (सिंधुदुर्ग) च्या पथकाने पकडला. ही कारवाई सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कुडाळ येथे मुंबई-गोवा महामार्गावर करण्यात आली. 1 लाख 68 हजार रु. चा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांसह ट्रक व टेम्पो मिळून 15 लाख 68 हजार 340 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे चंद्रकांत पालकर यांनी कुडाळ पोलिसांत फिर्याद दिली.
या प्रकरणी ट्रक चालक संतोष मनोहर शिंदे (43, रा. बेळगाव), रुपेश विष्णू माने (32, रा. बेळगाव), रवींद्र गजानन ढवण (42, रा. पावशी-ढवणवाडी) व दत्ता उर्फ सुशिल गुरुनाथ पडते (50, रा. कुडाळ बाजारपेठ) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक मंगळवारी रात्री सावंतवाडी ते कुडाळ असे गस्तीवर होते. त्यातील उपनिरीक्षक एस. एस. उर्फ शाहू देसाई यांना महामार्गावर कुडाळ येथील क्रांती सिरॅमिकसमोर मालवाहू ट्रकमधून गुटखा उतरवून तो छोटा हत्ती टेम्पोमध्ये भरत आहेत, अशी माहिती एका खबऱयाकडून मिळाली. त्यानुसार त्या पथकाने तेथे छापा टाकला. तेव्हा ट्रकमधून गोण्या उतरवून तो टेम्पोमध्ये भरत असल्याचे दिसले. गोण्यांमधील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सुशिल पडते याचे असल्याचे सांगितले. शिंदे तसेच क्लिनर रुपेश माने, सुशिल पडते व टेम्पोचालक रवींद्र ढवण या चौघांना ताब्यात घेत ट्रक व टेम्पोसह गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाहू देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुधीर सावंत, प्रवीण वालावलकर, प्रकाश कदम, अनिल धुरी, प्रमोद काळसेकर, चंद्रहास नार्वेकर, चंद्रकांत पालकर व प्रथमेश गावडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.
विमल, आर. एम. डी., रजनीगंधा, मिराज स्वदेशी, व्ही-वन, तुलसी आदी गुटखा, तंबाखू व पानमसाला मिळून 1 लाख 68 हजार रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दहा लाख रु. किमतीचा ट्रक व चार लाख रु. किमतीचा टेम्पोही जप्त करण्यात आला.
शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेळगाव ते कुडाळ अशी वाहतूक केली. तसेच कुडाळ-बाजारपेठ येथे तो विक्रीसाठी नेत असताना आढळल्याप्रकरणी पालकर यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन कदम तपास करीत आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (iv), 27 (3) (a), 27 (3) (9) सहवाचन कलम 30 (2), (अ) चा भंग कलम 59 सह भादवि कलम 188, 273 व 34 अन्वये शिंदे याच्यासह चारजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडून पर्दाफाश
बेळगावहून भाजीपाला व किराणा सामान घेऊन येणाऱया ट्रकमधून अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक तसेच विक्री करणाऱयांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला. अशा मालवाहू वाहनांतून छुप्या पद्धतीने या बेकायदा मालाची चोरटी वाहतूक सुरू असल्याचे उघड झाले आहे.