शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांचा आरोप
निवडणूक डोळय़ासमोर ठेवून घाईगडबडीत काम
एक पावसाळा तरी रस्ता टिकेल का?
वार्ताहर / कुडाळ:
कुडाळ बाजारपेठेतील रस्त्याचे काम निकृष्ट करण्यात आले आहे. केवळ नगरपंचायत निवडणूक डोळय़ासमोर ठेवून घाईगडबडीत रस्त्याचे निकृष्ट काम बाजारपेठवासियांच्या माथी मारण्याचे काम न. पं. करीत आहे, असा आरोप शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. एक पावसाळा तरी हा रस्ता टिकेल का?, याचे उत्तर न. पं. ने द्यावे, असा सवालही त्यांनी केला आहे.
येथील बाजारपेठेतील रस्त्याचे काम न. पं. ने निकृष्ट केले. डांबरही नाही आणि खडीमिक्स डांबरही नाही हे रस्त्याची पाहणी केल्यावर ठिकठिकाणी निदर्शनास येईल. मारुती मंदिरासमोरचा रस्ता पाहिल्यास निकृष्ट कामाची प्रचिती येईल. केवळ न. पं. निवडणूक डोळय़ासमोर ठेवून घाईगडबडीत रस्त्याचे निकृष्ट काम बाजारपेठ वासियांच्या माथी मारण्याचे काम न. पं. करीत आहे. का व कुणासाठी अशी कामे न. पं. करीत आहे, हे आता नागरिकांच्या लक्षात आले आहे. शनिवारी पूर्ण दिवसात न. पं. चे अभियंता कामावर दिसले नाहीत. मग त्यांचे काय काम असते?, असा सवाल शिरसाट यांनी करून नगरसेवक सुनील बांदेकर मात्र ठेकेदार असल्यासारखे फिरताना दिसत होते, असे म्हटले आहे.
पूर्ण काम निकृष्ट करण्यात आले आहे. जर स्वतः नगरसेवक या कामावर देखरेख करण्यासाठी उपस्थित असताना अशाप्रकारचे निकृष्ट काम त्यांच्या नजरेसमोर ते करून घेत आहेत, याचा अर्थ काय होतो? रस्ता आणि गटार यातील काही कळत नाही, तर हे प्रत्येक कामावर का उभे राहतात व कशासाठी? या कामाची पाहणी करावी व आपण कशी कामे करीत आहोत, याची खातरजमा करावी. बाजारपेठेमध्ये पावसात पाणी गटारात कमी आणि रस्त्यावर जास्त तुंबते, असे चित्र असताना हा रस्ता या पावसात वाहून जाणार आहे, असे वाटते. रस्ता किमान तीन वर्षे तरी टिकेल असा करावा, अशी बाजारपेठवासियांची मागणी आहे, असे शिरसाट यांनी या पत्रकात म्हटले आहे.