भाजपमध्ये प्रवेश : सेना सदस्यांकडून सभागृहात वेळोवेळी त्रास – नूतन आईर
वरिष्ठांकडून दखल घेतली
न गेल्याची खंत व्यक्त
कणकवलीत नीतेश राणेंच्या
उपस्थितीत भाजपात प्रवेश
प्रतिनिधी / कुडाळ:
आपण शिवसेनेची सभापती असतानाही शिवसेना पं. स. सदस्यांनी सभागृहात वेळोवेळी त्रास दिला. आपणास प्रत्येकवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही, म्हणून आपण भाजपमध्ये प्रवेश केला, असे कुडाळ पं. स. सभापती नूतन आईर यांनी गुरुवारी येथे सांगितले. सौ. आईर यांनी कणकवलीत आमदार नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
सौ. आईर यांनी कुडाळ येथे आल्यानंतर सभापती दालनात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जि. प. माजी अध्यक्ष रणजीत देसाई, दीपलक्ष्मी पडते, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, अस्मिता बांदेकर, संध्या तेर्से व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुडाळ पं. स. वर सेनेचे वर्चस्व
सौ. आईर यांनी डिसेंबर 2019 मध्ये कुडाळ पं. स. च्या सभापती पदाची सुत्रे हाती घेतली. त्या व त्यांचे पती तथा रांगणातुळसुली सरपंच नागेश आईर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. आईर हे राणे समर्थकच होते. पुन्हा त्यांनी राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या नाटय़ानंतर कुडाळ पं. स. सभागृहात शिवसेना दहा, तर भाजपा आठ असे संख्याबळ असल्याने सभापती भाजपमध्ये गेल्या, तरी कुडाळ पं. स. वर सेनेचे वर्चस्व आहे.
सभापती पदासाठी शिवसेनेत आले नव्हते
सौ. आईर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. सौ. आईर म्हणाल्या, आपणास शिवसेना पक्षाकडून राजीनामा देण्यास सांगितले नव्हते. तसेच आपल्यावर ठेकेदारीचे होणारे आरोप चुकीचे आहेत. आपण काय भ्रष्टाचार केला, हे सदस्य राजन जाधव यांनी सांगावे, असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले. आपण मुळातच सभापतीपद मिळविण्यासाठी शिवसेनेत आले नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे सभागृहात वर्चस्व असताना व आपण सत्ताधारी असताना चुकीच्या पद्धतीने प्रश्न उचलून धरण्यात येत होते. आता तर आपण विरोधात असल्याने सभागृहात अनेक प्रश्न सत्ताधारी उपस्थित करतील, हे नवीन नसल्याचे त्या म्हणाल्या.
भाजपच्या माध्यमातून देणार बळ!
सौ. आईर यांना शिवसेनेने सभापतीपद दिले होते. मात्र, सभागृहात सेना सदस्यांनी त्यांची अडवणूक करून काम करायला दिले नाही. तसेच जो शब्द दिला, तो पाळला नाही. त्यामुळे नूतन आईर व नागेश आईर हे राणे समर्थक असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला, असे देसाई म्हणाले. आईर दांपत्य व पक्षात काही गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी राणे यांची साथ सोडली होती. सेनेने त्यांना सभापती पद दिले. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, असेही ते म्हणाले. जि. प. वर भाजपची सत्ता असून भाजपच्यावतीने सौ. आईर यांना बळ देण्यात येईल. तसेच लवकरच कुडाळमध्ये मोठा कार्यक्रम घेण्यात येईल, असे ते म्हणाले. भाजपकडून शक्तिप्रदर्शन
भाजपने कुडाळ पं. स. कडे शक्तिप्रदर्शन करीत घोषणाबाजी केली. महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील, अश्विनी गावडे, साक्षी सावंत, भास्कर नाईक, दादा साईल, बंडय़ा मांडकुलकर, विनायक राणे, आनंद शिरवलकर, दीपक नारकर, सुनील बांदेकर, संजय वेंगुर्लेकर, बंडय़ा सावंत, पप्या तवटे, विजय कांबळी, राजा धुरी, अदिती सावंत, ममता धुरी, रेखा काणेकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेला आणखी मोठे धक्के देणार!
आमदारांनी ठेकेदार कोणत्या पक्षात आहेत, हे प्रथम जाहीर करावे, असे देसाई यांनी सांगून ठेकेदार सत्तेत सहभागी होण्यासाठी शिवसेनेत गेल्याचे सांगून सेनेला आणखी मोठे धक्के देणार असल्याचे सुतोवाच केले.