फोंडा डिचोली व अन्य मार्गावरील वाहतुकीत बदल
प्रतिनिधी /फोंडा
मेस्तवाडा कुर्टी येथे मुख्य रस्त्यावर असलेला जुना साकव मोडून त्याजागी नवीन साकवाचे बांधकाम हाती घेण्यात येणार आहे. फोंडय़ाचे आमदार रवी नाईक यांच्याहस्ते काल मंगळवारी सकाळी या कामाला श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागातर्फे अंदाजे रु. 1 कोटी 21 लाख खर्चून हा नवीन साकव उभारण्यात येणार आहे.
यावेळी फोंडा पालिकेचे नगरसेवक रितेश नाईक, कुर्टी पंचायतीचे सरपंच सुनील खेडेकर, पंचसदस्य दादी नाईक, शैलेश शेट, रस्ता विभागाचे साहाय्यक अभियंते अरविंद फडते, वृंदावन इंजिनियर्स व कॉन्ट्रक्टर आस्थापनाचे श्री. नायर हे उपस्थित होते. येत्या मार्चपर्यंत या नवीन साकवाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी आमदार रवी नाईक यांनी दिली. फोंडा डिचोली मार्गावर असलेला मेस्तवाडा कुर्टी येथील हा साकव जुना झाल्याने व वाढत्या वाहतुकीचा विचार करुन त्याजागी नवीन साकव उभारण्याचा प्रस्ताव आपण काही वर्षांपूर्वी मांडला होता. साकव अरुंद असल्याने एकावेळी दोन वाहने त्यावरुन जाण्याची सोय नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करुन नवीन साकव बांधण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
1 ऑक्टोबरपासून वाहतूक कुर्टी बगलरस्त्याने वळविणार
वरचा बाजारमार्गे फोंडा शहरात प्रवेश करणाऱया उसगाव, साखळी डिचोली, वाळपई, धारबांदोडा मोले या भागातील प्रवासी व अन्य वाहनांना मेस्तवाडा कुर्टी येथील हा साकव लागतो. या मार्गावरुन फोंडा बाजार व शहराकडे जाणारी वाहने कुर्टी बगलरस्त्याने वळविण्यात येतील. सेंटमेरी हायस्कूलकडे जाण्यासाठी हाऊसिंगबोर्ड येथून तर फोंडा बाजारात जाण्यासाठी नागझर कुर्टीमार्गे अंतर्गत रस्त्यावरुन प्रवासी व अन्य वाहनांना ये जा करण्याची सोय असेल. साकवाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनचालक व प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार रवी नाईक यांनी केले आहे.