ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील देण्याची भारताची मागणी पाकिस्तानने फेटाळून लावली आहे. पाकिस्तानच्या न्यायालयात कुलभूषण यांची बाजू मांडण्यास भारतीय वकिलाला परवानगी देणे कायद्यात बसत नसल्याचे पाकने म्हटले आहे.
कुलभूषण यांची बाजू मांडण्यासाठी भारतीय वकिलाला संधी द्यावी, अशी मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. मात्र, कायदेशीररित्या हे शक्य नाही. पाकमध्ये वकिली करण्याचा परवाना असलेलेच लोक इथे वकिली करू शकतात. याची भारतालाही कल्पना आहे. तरी देखील भारत अशा प्रकारची मागणी करत आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयामध्ये असेही म्हटले आहे की, परदेशी वकील देशामध्ये वकिली करू शकत नाहीत.
हेरगिरी आणि दहशतवादाच्याआरोपाखाली कुलभूषण हे पाकिस्तानमध्ये अटकेत असून, त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने त्यांना एप्रिल 2017 मध्ये ही शिक्षा सुनावली आहे.