वार्ताहर/ जांबोटी
हैद्राबादहून गोव्याकडे जाणाऱया खासगी आराम बसचा अपघात होऊन 11 प्रवासी जखमी झाल्याची दुर्घटना बेळगाव-चोर्ला राज्य महामार्गावर कुसमळी गावानजिक शुक्रवारी सकाळी घडली.
या बाबतची अधिक माहिती अशी कि, लीओ लायनर या ट्रव्हल्स व टूर्स कंपनीची एन. एल. 07 बी 0495 हि व्होल्वो आराम बस हैद्राबादहून गोव्याकडे निघाली होती. शुक्रवारी पहाटे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने सदर बस कुसमळी गावानजिकच्या वळणावर पलटी झाली. यावेळी सर्व प्रवासी झोपेतच होते. सुदैवाने यामध्ये जिवितहानी झाली नाही. मात्र बसमधील 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बेळगाव येथील विजया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जांबोटी आऊट पोस्टचे पोलीस हवालदार मुल्ला यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमीना उपचारासाठी रुग्ण वाहिनेतून बेळगावला पाठविण्यास मदत केली.
खानापूरचे पोलीस निरिक्षक बसन्नगौडा पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास सुरु आहे.
बेळगाव – चोर्ला महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून चार खासगी आराम बसना अपघात झाला आहे.