शोकाकुल वातावरणात, लाखावर जनसमुदायाचा अखेरचा निरोप
प्रतिनिधी/ कराड
जम्मू-काश्मीर येथील नौसेरा सेक्टर येथे कर्तव्य बजावताना धारातिर्थी पडलेले शहीद संदीप रघुनाथ सावंत (वय 29) यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी दीड वाजता मुंढे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशप्रेमाने भारावलेल्या शोकाकुल वातावरणात सैन्य दलातील जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. वीरबंधू सागर यांच्या हस्ते संदीप यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. मुंढेच्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाचे डोळेही पाणावले. ‘शहीद संदीप सावंत अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
जम्मू-काश्मीर येथील नौशेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी घुसखोरी करत हल्ला चढवला. वीरपुत्र संदीप सावंत यांच्या पथकाने दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जशास तसे प्रत्यत्तुर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत संदीप सावंत यांना वीरमरण आले. शुक्रवारी सकाळी शहीद संदीप यांचे पार्थिव कराडच्या विजय दिवस चौकात आणण्यात आले. पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड मोठा जनसमुदाय लोटला होता. विजय दिवस चौकात पाय ठेवायलाही जागा नव्हती एवढी गर्दी झाली होती. खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेतले. फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून तिरंग्यात लपेटलेले पार्थिव मिरवणुकीने मुंढेच्या दिशेने मार्गस्थ झाले. हजारो युवक युवतींसह लाखोचा जनसमुदाय मिरवणूकीत सहभागी झाला होता. संदीप सावंत यांनी गाजवलेल्या शौर्याच्या घोषणा दिल्या जात होत्या. ‘शहीद संदीप सावंत अमर रहे’च्या घोषणा दिल्या जात होत्या. कोल्हापूर नाक्यावरून मिरवणूक कोल्हापूर-पुणे महामार्गावरून मुंढेच्या दिशेने गेली. महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. महामार्गालगतच्या रस्त्यावरून शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव मुंढे गावात नेण्यात आले. गावातील रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढली होती. प्रत्येक घरासमोर तिरंगा, भारताचा नकाशा, जवानाचे चित्र रेखाटत रांगोळी काढलेली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला महिला, पुरूष, अबालवृद्ध फुले उधळत होते. ज्या गावात संदीप लहानाचे मोठे होऊन सैन्यात सहभागी झाले, त्या गावातील त्यांचा अखेरचा प्रवास पाहताना अनेकांच्या डोळय़ातून पाणी येत होते.
शहीद संदीप यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. तिथे पत्नी स्मिता, तीन महिन्यांची मुलगी रिया, आई अनुसया, वडील, भाऊ यांच्यासह नातेवाईकांनी आक्रोश केला. शहीद संदीप यांच्या जाण्याने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात पार्थिव दुपारी पावणेएकच्या सुमारास आणण्यात आले. त्यावेळी लाखोंचा जनसमुदाय लोटला होता. या पार्श्वभूमीवर कराड-पाटण मार्गही काही काळ बंद करून तो तांबवेमार्गे येणके, पोतले, घारेवाडी, कराड असा वळवण्यात आला होता.
सैन्यदलाच्यावतीने पार्थिवावरील तिरंगा वीरपत्नी स्मिता, वीरमाता अनुसया यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. कॅबिनेट मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांत उत्तम दिघे, पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, किशोर धुमाळ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह राजकीय, शासकीय क्षेत्रातील पदाधिकारी, अधिकाऱयांनी श्रद्धांजली वाहिली.
सैन्यदलातील जवानांच्या तुकडीसह महाराष्ट्र पोलिसांनी शहीद संदीप यांना मानवंदना दिली. सैन्यदलाच्यावतीने बंदुकीतून हवेत पाच फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यानंतर शहीद संदीप यांच्या बंधूने भडाग्नी दिला.
सात किलोमीटर चालला जनसमुदाय…
शहीद संदीप सावंत यांच्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी लाखोचा जनसमुदाय लोटला होता. शुक्रवारी सकाळी 8 वाजता विजय दिवस चौकातून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. तेथून मुंढेपर्यंत महामार्गावरून जनसमुदाय 7 किलोमीटर चालला. शहीद संदीप सावंत अमर रहेच्या घोषणा देत जनसमुदायाने एकात्मतेचे दर्शन घडवले.
चिमुकल्या रियाला पाहून उपस्थित हेलावले
शहीद संदीप सावंत यांचे पार्थिव अंत्यसंस्कारस्थळी आणल्यानंतर अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. तेव्हा संदीप यांच्या आई, पत्नी व तीन महिन्याच्या मुलीला गाडीतून आणण्यात आले. अंत्यसंस्कार सुरू असताना संदीप यांच्या चिमुकल्या मुलीला घेऊन तिचा मामा चबुतऱयावर आला. संदीप यांचे बंधू भडाग्नी देता असतानाच चिमुकली मुलगी मामाच्या हातात होती. हे दृश्य पाहून उपस्थित लाखोंचा जनसमुदाय हेलावला.
व्यवहार बंद ठेवून वाहिली श्रद्धांजली
शहीद संदीप सावंत यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या पार्श्वभुमीवर कराड, मुंढेसह कराड पाटण रोडवरील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी, व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवून शहीद संदीप यांना श्रद्धांजली वाहिली. कराड-पाटण रोडवरील सर्वच हॉटेल व्यवसायही बंद ठेवला होता. मुंढे, गोटे, विजयनगर गावात तर आपल्या घरातील सदस्य गेल्याच्या भावनेने सन्नाटा पसरला होता.