कर्त्य पुरूष गेल्याने संसार उघड्यावर
प्रतिनिधी / गारगोटी
कूर (ता. भुदरगड) येथील ट्रक व्यवसायासाठी परिचीत असणारे धनाजी बाजीराव देसाई (वय ४८) यांचे कोरोनाने शुक्रवारी (दि. १८) रोजी निधन झाले तर त्यांचा कोरोनाबाधित भाऊ नेताजी बाजीराव देसाई (वय ४४) यांचे दोन दिवस अगोदर बुधवार ( दि .१६ ) रोजी पहाटे निधन झाले. विशेष म्हणजे या दोघांचे वडील बाजीराव देसाई (वय ८५) जे गेले ४ते ५ वर्ष आजारी असल्याने अंथरुणावरच खिळून होते त्यांचे शुक्रवार (दि.११) रोजी निधन झाले. चार-पाच दिवसाच्या अंतराने घरातील दोन कर्त्या भावांचा अकाली व वडीलांच्या निधनाने देसाई कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात या घटनेबाबत हळवळ व्यक्त होत आहे.
कूर गावापासून दोन ते अडीच किलोमीटरवर देसाई कुंटुंबाची शेतात वस्ती. गावाशी संपर्क कमी, पण अचानक कोरोनाचा शिरकाव झाला. घरातील नऊ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझीटिव्ह आले होते. त्यांच्या पत्नी, मुले, भावजय, चुलते या सर्वांनी दवाखान्यात उपचार घेत कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. परंतु धनाजी आणि त्यांचा भाऊ नेताजी यांची वडीलांच्या रक्षा विसर्जन दिवशीच तब्बेत अधिकच बिघडल्याने त्यांना कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचार चालु असताना एक दिवसाच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे घरातील नऊ जण जणांवर गारगोटी येथे उपचार चालु होते त्यामुळे त्यातील दोघांच्या मृत्युची बातमी त्यांना सांगण्यात आली नव्हती. बरे होऊन घरी आल्यानंतर मृत्युची बातमी सांगताच नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन सुन्न करणारा होता. धनाजी देसाई हे भैरवनाथ सेवा संख्येचे संचालक आहेत. तसेच या परिसरातील ८०च्या दशकापासुन ट्रक व्यवसाईक म्हणून परिचित होते. त्यांचा मितभाषी प्रभृत्वाने मित्र परिवार ही मोठा आहे. त्याच्या मागे आई, पत्नी, भावजय, मुलगा, मुलगी, पुतणे, भाऊ, चुलते असा परिवार आहे. पिता व दोघा पुत्रांचा अकाली झालेल्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.