पुणे / प्रतिनिधी :
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चर (एमसीसीआयए) यांच्यावतीने कृषी निर्यात या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय परिषदेत कृषी-फलोत्पादन निर्यातीमधील आधुनिक कल, नवीन पुढाकार, नव्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. येत्या शुक्रवारी (दि. 17) सकाळी 9.30 ते सायंकाळी 6 यावेळत गॅलरी एमसीसीआयए, पाचवा मजला, ए-विंग, एमसीसीआयए ट्रेड टॉवर, एस. बी. रोड येथे ही परिषद होणार आहे.
राज्यात पिकविण्यात येणारी ताजी फळे, भाजीपाला आणि फुले या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच शेती निर्यातीसंबंधी असणारी आव्हाने व त्यातील संधी, कापणीनंतर घेण्याची काळजी आणि साठवण यासाठी लागणाऱया अत्याधुनिक पायाभूत सुविधा, निर्याती रोपांचे विभक्तीकरण, अद्यावत प्रमाणीकरण, लॉजेस्टिक सपोर्ट, मानक कार्यपद्धती, महत्त्वाच्या देशांतील आयातीबाबतचे नियम, किटनाशकांविषयी निकष, किमान अवशेष पातळी, नवे पॅकिंग तंत्रज्ञान, केंद्रीय व राज्य शासनाचे उपक्रम, भौगोलिक संकेत, किडमुक्ती क्षेत्राचे प्रमाणपत्र, सेवा प्रदात्यांसाठी प्रदर्शन या विषयांचा देखील समावेश असणार आहे.
एमसीसीआयने कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, अपेडा, वाणिज्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळ आणि नाबर्ड यांना या परिषदेसाठी भागीदार म्हणून आमंत्रित केले आहे. या परिषदेत कृषी निर्यातीवर एका प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून, यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातील तज्ञांच्या लेखांचा समावेश असेल.
कृषी निर्यातीचा प्रसार करण्यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या अनुशंगानेच मराठा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रीकल्चर कृषी निर्यातीवर या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. यात सहभागी होण्यासाठी kiranj@mcciapune.com या ईमेल आयडीवर किंवा 09172108604 या क्रमांकावर संपर्क करावा.