आक्षेप नोंदविण्याचे आवाहन : 15 ऑगस्टपर्यंत मुदत, निवडणुका घेण्याच्यादृष्टीने हालचाली
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेपाठोपाठ आता कॅन्टोन्मेंट बोर्डच्या तात्कालिक मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदारयादीबाबत माहिती घेण्यासाठी दि. 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करण्यात आल्या असून मतदारांची नावे आहेत का? याची चाचपणी करावी, तसेच कोणत्याही प्रकारचे आक्षेप असल्यास लेखी स्वरुपात देण्याचे आवाहन कॅन्टोन्मेंट बोर्डच्यावतीने करण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2020 मध्ये संपुष्टात आली होती. मात्र, दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी लोकनियुक्त सभागृह विसर्जित करण्यात आले. मात्र, मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट पसरल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डवर प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डची लोकसंख्या 20 हजारच्या घरात असून 7 वॉर्ड आहेत. यापूर्वी वॉर्ड आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. 7 पैकी 2 वॉर्ड महिलांसाठी आणि 1 वॉर्ड मागासवर्गीयांसाठी राखीव आहे.
निवडणुका घेण्याच्यादृष्टीने संरक्षण खात्याने सर्व तयारी केली होती. केवळ मतदारयादी प्रसिद्ध करून निवडणुका जाहीर करणे आवश्यक होते. पण कोरोनाच्या प्रसारामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. आता कोरोनाची लाट ओसरल्याने कार्यालयीन कामकाजास प्रारंभ झाला आहे. नुकताच महापालिकेची मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पाठोपाठ आता कॅन्टोन्मेंटनेही तात्कालिक मतदारयादी प्रसिद्ध केली आहे. आगामी काळात कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका घेण्याच्यादृष्टीने हालचाली चालविल्या आहेत. दि. 15 ऑगस्टपर्यंत मतदारयाद्या उपलब्ध करण्यात आल्या असून नावातील चुका किंवा अन्य ठिकाणी नावे नोंद झाली असल्यास, अन्यथा मतदारयादीमध्ये नाव प्रसिद्ध झाले नसल्यास तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. 16 व 17 रोजी सकाळी 10 वाजता तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंटच्या 7 वॉर्डची मतदारयादी ठिकठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
खालील ठिकाणी नोटीस बोर्डवर वॉर्डनिहाय मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
वॉर्ड क्रमांक | ठिकाण |
1 ते 7 | कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यालय |
1 | स्टेशन हेडक्वॉर्टर |
2 | किल्ला पीडब्ल्यूडी कार्यालय |
3 | सेंट पॉल्स हायस्कूल |
4 | पोस्ट ऑफिस, स्वामी बेकरीसमोर |
5 | कॅम्प पोलीस स्टेशन |
6 | कॅथॉलिक को-ऑप. बँकेजवळ |
7 | पेट्रोलपंप, ओल्ड पोस्ट ऑफिस रोड |