रुंदीकरणासाठी 25 कोटीची आवश्यकता : एसएसडीपी योजनेंतर्गत निधी मंजूर
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शहराला जोडणाऱया प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात येत आहे. सांबरा रोडचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव असून चारपदरी करण्यात येणार आहे. निधीकरिता हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
शहराला जोडणारे विविध रस्ते राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येतात. शहरात वर्दळीच्या रस्त्यांचे रुंदीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. शहराला जोडणाऱया बॉक्साईट रोड, हिंडलगा रोड, मच्छे रोड, तसेच हलगा रोड, कणबर्गी रोड आदी रस्त्यांचा विकास केला आहे. यापूर्वी या रोडचे दुपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांवरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. विमानतळावर उतरणाऱया विमानांची संख्या वाढल्याने प्रवाशांची संख्याही वाढत आहे. सदर रस्ता वाहतुकीसाठी अपुरा पडत असल्याने चारपदरी करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केला आहे. यापूर्वी रस्त्यांचे रुंदीकरण करून दुभाजक व गाव असलेल्या ठिकाणी सेफ्टी कॅरिडोअर निर्माण करण्यात आले होते.
शहराला जोडणाऱया उपनगरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्याकरिता हा रस्ता चारपदरी करण्यात येणार आहे. सध्या रस्त्याच्या एका बाजूची रुंदी पाच मीटर आहे. काही ठिकाणी कमी-जास्त असून यापुढे सरसकट 15 मीटरचा रस्ता करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार दोन्ही बाजूंनी अडीच मीटरप्रमाणे रस्ता रुंद करण्यात येणार आहे. सदर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 25 कोटी निधीची आवश्यकता आहे. एसएसडीपी योजनेंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात गांधीनगर एससी मोटर्सपासून मुतगा गावापर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱया टप्प्यात पुढील काम हाती घेण्यात येणार आहे. हा प्रस्ताव तयार करून राज्याच्या अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सांबरा रोड लवकरच मोठा होणार आहे.