चार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत : सर्वसामान्यांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डने थकीत वीजबिल न भरल्याने हेस्कॉमने कॅन्टोन्मेंटला पथदीपासाठी करण्यात येणारा वीजपुरवठा बंद केला. यामुळे कॅन्टोन्मेंट परिसर अंधारात आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डने बिल भरले नसल्याने सर्वसामान्यांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.
मागील तीन वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डने वीजबिल थकविले आहे. पथदीप व पाणीपुरवठय़ासाठी हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला वीजपुरवठा केला जातो. तीन वर्षांमध्ये हे वीजबिल आता चार कोटींवर गेले आहे. प्रत्येक महिन्याला हेस्कॉमकडून बिल भरण्याबाबत कॅन्टोन्मेंटला नोटिसा पाठविल्या जातात. परंतु कॅन्टोन्मेंटकडून दुर्लक्ष केले जात आहे. निधी आल्यानंतर वीजबिल दिले जाईल, असे सांगण्यात येते.
बिल न भरल्यामुळे 17 जानेवारीला हेस्कॉमकडून वीजपुरवठा बंद करण्यात आला. किल्ला, कॅम्प परिसरातील सर्व पथदीप बंद झाले. 55 ठिकाणचे कंट्रोल मीटर व अंदाजे एक हजार ठिकाणचे पथदीप बंद आहेत. सध्या तरी पाणीपुरवठय़ासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून वीजपुरवठा केला जात असला तरी पुढील काळात तोही बंद करण्याचा इशारा हेस्कॉमने दिला आहे.
अद्याप कॅन्टोन्मेंट बोर्डकडून बिल भरले नाही
महिनाभरापूर्वी हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट बोर्डचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. थकीत चार कोटी रुपयांचे वीजबिल भरण्याबाबत वारंवार नोटिसा देण्यात आल्या आहेत. बिल न भरल्याने पथदीप बंद आहेत. यासंदर्भात महानगरपालिका, कॅम्प पोलीस व स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देण्यात आली आहे. अद्याप कॅन्टोन्मेंट बोर्डकडून विद्युत बिल भरण्यात आले नसल्याचे अरविंद गदगकर यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
-अरविंद गदगकर (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)