प्रतिनिधी/ कराड
‘आमच्या लहान मुलाला जेव्हा कॅन्सर झाल्याचं कळालं, तेव्हा आम्ही पुरते हादरून गेलो… सगळे पैसे संपल्यानं याचा खर्च कसा करायचा?असा प्रश्न आमच्यासमोर होता. शेवटी मी आणि माझ्या पत्नीनं आत्महत्या करायचं ठरवलं! पण त्याचवेळी मला कृष्णा रूग्णालयामधील उपचारांची माहिती मिळाल्यावर मी माझ्या मुलाला; राजवीरला इथं दाखल केलं. इथं त्याच्यावर डॉ. सुरेश भोसले, डॉ. आनंद गुडूर, डॉ. रश्मी गुडूर आणि कृष्णा रूग्णालयाच्या सर्व टीमनं त्याच्यावर अत्यंत यशस्वी उपचार केले, ज्यामुळे तो आता कॅन्सरपासून पूर्णपणे बरा झालाय. अशा शब्दांत भावना व्यक्त करत कोल्हापूरचे गौरव पाटील यांनी आपल्या आठ वर्षाच्या मुलाच्या संघर्षाची कहाणी लोकांना सांगितली. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ आणि कृष्णा रूग्णालयाचा कॅन्सर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कॅन्सर दिनानिमित्त कॅन्सरवर यशस्वी मात केलेल्या रुग्णांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते कॅन्सरची प्रतिकृती असलेल्या फलकावरील फुगे फोडून कॅन्सरला हद्दपार करण्याचा संकल्प करत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका उत्तरा भोसले, विद्यापीठचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलिमा मलिक, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, अमेरिकास्थित डॉ. मेघा जोशी, कॅन्सर विभागप्रमुख डॉ. आनंद गुडूर आदी मान्यवर उपस्थित होते.