वृत्तसंस्था / बार्सिलोना
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत स्पेनची विद्यमान ऑलिम्पिक सुवर्णजेती कॅरोलिना मरिन हिच्या सहभागाविषयी अनिश्चितता निर्माण झाली आहे. मरिनला सरावावेळी गुडघ्याला दुखापत झाल्याने ती या स्पर्धेत खेळेल का, याबाबत साशंकता आहे.
2016 रिओ ऑलिंपिक स्पर्धेत मरीनने सुवर्णपदक पटकाविले होते. शुक्रवारी सरावावेळी उजव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तिला सरावातून माघार घ्यावी लागली. डॉक्टरांनी काही चाचण्या घेतल्या असून त्यानुसार गुडघ्याच्या वाटीमधील स्नायू दुखावल्याने तिच्या गुडघ्याला सूज आली आहे. 2019 जानेवारीमध्ये देखील मरिनला उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. 2020-21 बॅडमिंटन हंगामात तिने पाच स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शवत त्यापैकी चार स्पर्धा जिंकल्या आहेत.