तुम्ही कॅशबॅकबद्दल ऐकलं असेल. ऑनलाईन खरेदी असो किंवा दुकानातली खरेदी असो; कॅशबॅक ऑफर्सची यादी पहायला मिळते, अमूक क्रेडिट कार्ड वापरल्यास 10 टक्के कॅशबॅक, या बँकेचं डेबिट कार्ड वापरल्यास पाच टक्के कॅशबॅक असे बोर्ड लिहिलेले असतात. आता कॅशबॅक म्हणजे नेमकं काय? कॅशबॅक म्हणजे पैसे परत मिळणं. समजा, तुम्ही पाच हजार रुपयांची वस्तू खरेदी केली आणि त्यावर पाच टक्के कॅशबॅक असेल तर तुम्हाला तेवढी रक्कम परत मिळते. कॅशबॅक ऑफर्स ही ग्राहकांना आकर्षित करण्याची खूप चांगली पद्धत आहे. त्यामुळे कॅशबॅक ऑफर्सची भुरळ पडण्याआधी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. खरेदी करण्याआधी कॅशबॅकशी संबंधित नियम, अटी, शर्थी नीट तपासून बघा. इथे फसवणूक होण्याची शक्यता असते. जर, तर, आणि किंवा अशा शब्दांचा प्रयोग झालेला असतो. त्यामुळे 20 टक्के कॅशबॅकला भुलू नका. 20 टक्के कॅशबॅक असली तरी त्यासाठी तुम्हाला अमूक रुपयांची खरेदी करावी लागते. काही प्रसंगी कॅशबॅक मिळत असली तरी ठराविक आकडय़ापर्यंतच मर्यादीत असते. एक हजार रुपयांपेक्षा जास्त कॅशबॅक मिळत नाही, असं म्हटलं जातं तेव्हा कॅशबॅकची मर्यादा एक हजार रुपये इतकीच असते, हे लक्षात घ्या.
कॅशबॅक किती महिन्यात परत मिळणार हे जाणून घ्या. काही वेळा पाच ते सहा महिन्यांनी कॅशबॅक मिळतं. तसंच हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार का क्रेडिट कार्डमध्ये जोडले जाणार, हेही जाणून घ्या. काही वेळा कूपन्स किंवा गिफ्ट व्हाउचर्स दिली जातात. त्यामुळे पैसे परत मिळणार का त्याऐवजी गिफ्ट कूपन्स दिली जाणार हे जाणून घ्या. बर्याच कंपन्या कॅशबॅकची रक्कम वॉलेटमध्ये समाविष्ट करतात.
त्यामुळे ही रक्कम संबंधित साईटवरून खरेदी करताना वापरता येते. एकंदरीत, सगळ्या नियमांची नीट माहिती घेऊनच कॅशबॅकच्या फंदात पडा.