रविवारी पुन्हाचारजणताब्यात: विजापूरयेथूनअटक : संशयितांकडूनदोनदुचाकी, तलवारमोबाईलजप्त
वार्ताहर/ विजापूर
गत आठ दिवसांपूर्वी कन्नाळ क्रॉसजवळ महादेव सावकारांवर गोळीबार करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, गुरुवारी 2 तर शनिवारी 5 जणांना अटक करण्यात आली होती. रविवारी पुन्हा 4 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी, एक तलवार, दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. काशिनाथ बिराप्पा ताळीकोट (वय 23, रा. विजापूर), यासीनअली हुसेनसाब मुजावर (वय 24, रा. सारवाड, ता. बबलेश्वर), राज उर्फ राजअहमद रजाकसाब गुण्णापूर (वय 27, रा. विजापूर), सिद्धू गुरुबसाप्पा मुडलगी (वय 24, रा. विजापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सदर संशयित आरोपींना रविवारी सकाळी विजापुरातून ताब्यात घेण्यात आले.
महादेव सावकार यांच्यावर 15 ते 20 जणांनी केलेल्या हल्ल्यामुळे भीमातीर हादरला होता तसेच या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिणामी, या हल्ल्याची गंभीर दखल घेऊन हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलीस महानिरीक्षक राघवेंद्र सुहास व जिल्हा पोलीसप्रमुख अनुपम अगरवाल यांनी दोन पथकाची नेमणूक केली होती. त्यानुसार पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत आरोपींची शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, पथकाने गुरुवारी 2, शनिवारी 5 तर रविवारी 4 जणांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचाही कसून शोध घेण्यात येत असून मुख्य आरोपी मडिवाळ हिरेमठ अद्याप फरार असून त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान, विजापूर येथे मडिवाळ हिरेमठ यांच्या स्वामी फायनान्स कार्यालयात महादेव सावकार यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येक आरोपीला एक लक्ष्य देण्यात आले होते. त्यानुसार 15 ते 20 टोळक्यातील आरोपींनी दिलेले लक्ष्य पार पाडत महादेव सावकारांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा जणांचा बळी गेला असून महोदव सावकार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. परिणामी, या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी करून या हल्ल्यात सामील असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख रामसिद्ध अरसिद्धी, विजापूरचे डीएसपी लक्ष्मीनारायण, ग्रामीण पोलीस स्थानकाचे सीपीआय महांतेश द्यामण्णावर, सीपीआय रविंद्र नायकोडी, सीपीआय सी. बी. बागेवाडी, सीपीआय सुरेश, सीपीआय सुनील कांबळे, सीपीआय बसवराज मुकर्तीहाळ, सीपीआय सोमशेखर आदी उपस्थित होते.