व्यावसायिकांना चांगले दिवस : ट्राफिकची समस्या वाढली
प्रतिनिधी / पणजी
राज्यात कॅसिनो सुरु होऊन दोन दिवस झाले असून पणजी शहर परत गजबजु लागले आहे. कोरोनाच्या काळात सर्वकाही बंद होते. परंतु कॅसिनो सुरु झाल्यानंतर पणजी परत पूर्वपदावर येत आहे. याआधी पर्यटनाला परवाणगी मिळाली होती, पर्यटक देखील हळूहळू राज्यात दाखल झाले होते पण कॅसिनो सुरु झाल्यामुळे पर्यटन हंगाम बहरला आहे.
राज्यातील लहान मोठे व्यवसायला आता चालना मिळाली आहे. राजधानीतील सर्व हॉटेल्स फुल झाली आहे. तसेच लहान दुकानांवर, हॉटेल्सवर पर्यटकांची गर्दी सुरु झाली आहे. तसेच टॅक्सी, पायलट व प्रामुख्याने रेंट अ बाईक किंवा कार यांना मोठय़ा प्रमाणात मागणी सुरु झाली आहे. विदेशी पर्यटकांपेक्षा देसी पर्यटक मोठय़ा प्रमाणात गोव्यात दाखल झाले आहे.
रस्त्यावर वाढली ट्राफिकची समस्या
पर्यटक गोव्यात दाखल झाल्यामुळे रस्त्यावर ट्राफिकची समस्या वाढली आहे. गेले कित्येक महिने शांत असलेली राजधानी परत ट्राफिकच्या समस्येत गुदरमली आहे. कॅसिनो सुरु झाल्यामुळे जुने सचिवालय व आजुबाजुच्या परीसरात प्रचंड ट्राफिक झाले आहे. या भागातील पार्किंगची समस्येत देखील वाढ झाली आहे. बेजाबदारपणे अनेकदा गाडय़ा पार्किंग केल्या जातात याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे या भागातील स्थानिक राहीवासांना त्यांच्या घरापुढे त्यांची स्वतःची वाहने पार्किंग करायला मिळत नाही.
कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचा फज्जा
कॅसिनो सुरु झाल्याने स्थानिकांना पर्यटकांच्या बेजाबदारपणाचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक पर्यटक कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करताना दिसत नाही. कॅसिनोच्या परीसरात सामाजिक दुरी कुठेही दिसून येत नाही, तसेच मास्क देखील व्यवस्थित परीधान करत नाही. यावर कुणाचेही नियंत्रण नाही.