जम्मू-काश्मीर, लडाखसाठी 520 कोटीची मदत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात शालेय शिक्षण व्यवस्था बळकट व्हावी यासाठीच्या ‘स्टार्स’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने संमती दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे जम्मू-काश्मीर व लडाखसाठी 520 कोटी रुपयांच्या मदतीची योजनाही संमत करण्यात आली. स्टार्स योजनेचा महाराष्ट्राला विशेषत्वाने लाभ होणार आहे, असे सांगण्यात येत आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत निर्णयांची माहिती दिली. केंद्र सरकारने कौशल्यविकास योजना स्वयंरोजगार निर्मितीसाठी सुरू केली होती. या योजनेलाही बळ दिले जाणार आहे. स्टार्स (स्ट्रेंदनिंग टीचींग-लर्निंग अँड रिझल्टस् फॉर स्टेटस्) ही योजना नवीन असून ती शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणण्यात येणार आहे.
ही योजना शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीने क्रियान्वित केली जाणार आहे. प्रारंभी ती हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा या राज्यांमध्ये क्रियान्वित होईल. नंतर आवश्यकतेनुसार देशभर तिचा विस्तार केला जाणार आहे. या योजनेला जागतिक बँकेचे साहाय्य मिळणार असून ती 5 हजार 718 कोटी रुपये खर्चाची आहे. अबुधाबी देशाला तेलसाठय़ापैकी निम्मा तेलसाठा विकण्यासाठी अनुमती देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.