वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पुढील महिन्यात होणाऱया आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेपूर्वी घेण्यात येणाऱया सराव शिबिरासाठी या संघाच्या खेळाडूंकरिता क्वारंटाईन कालावधीला प्रारंभ झाला आहे. सराव शिबिरात दाखल होणाऱया खेळाडू आणि प्रशिक्षक वर्गाला किमान सात दिवसांसाठी क्वारंटाईन सक्तीचे राहील.
रविवारपासून सुरू झालेल्या क्वारंटाईन कालावधीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक, साहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर, वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटी आणि फलंदाज राहुल त्रिपाठी यांचा समावेश आहे. 2021 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा संघ आपले प्राथमिक गटातील सामने चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, दिल्ली आणि बेंगळूर येथे खेळणार आहेत. सदर स्पर्धेला 9 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. 30 मेला या स्पर्धेचा अंतिम सामना होईल.