राहिलेले काम लवकर पूर्ण करून घेण्याचा निर्देश
वार्ताहर/ केपे
केपे पालिका नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी आपला पदाचा ताबा घेतल्यानंतर पालिका क्षेत्रात कामाला सुरुवात केली असून त्यांनी केपे पालिकेच्या नवीन मार्केट इमारतीची पाहणी केली व राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असा निर्देश पालिका इंजिनियरना दिला.
दोन वर्षांपूर्वीपासून नवीन मार्केट इमारतीचे काम चालू आहे. ते जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे. मात्र पालिका निवडणुकाच्या वेळी हे काम ठप्प झाले होते. तळमजल्यावर भाजी-मासळी मार्केट व त्याच्या वर तीन मजले, त्यात दुकाने व त्याच्यावर हॉल अशी रचना या इमारतीची असून सुमारे 9 कोटी खर्चाची ही इमारत आहे.
अनेक वर्षांपासून केपेवासियांची मागणी होती की, सुसज्ज असे भाजी व मासळी मार्केट केपे पालिका क्षेत्रात व्हावे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर हा विषय सुटण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या इमारतीची राहिलेली कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत व कोणत्या कारणाने ती अडली आहेत हे पाहण्याकरिता नव्या नगराध्यक्षा शिरवईकर यांनी इंजिनियर नितीन कोठडकर, हेड क्लार्क अमिता केणी यांच्यासोबत सदर इमारतीची पाहणी केली व कामाचा आढावा घेतला. त्यानंतर कंत्राटदाराशी बोलणी करून काम पुन्हा सुरू करण्यास सांगितले व लवकरात लवकर काम पूर्ण करून घ्यावे असे पालिका इंजिनियरनाही सांगितले.