काँग्रेस नगरसेवकांकडून प्रयत्न, भाजप गटातील असंतुष्टांचे सहकार्य घेण्याची तयारी, मात्र आमदार एल्टन डिकॉस्तांना रस नसल्याने मोहीम अडली
वार्ताहर /केपे
मतदारसंघात नवीन आमदार निवडून येताच पालिका व पंचायतीत सत्ताबदल होणे हे स्वाभाविक असते. केपे मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले एल्टन डिकॉस्ता यांच्या सर्मथक गटाला केपे पालिकेत सत्तापरिवर्तन करण्याचे वेध लागले आहेत. त्याकरिता हवे तसे संख्याबळ नसतानाही सत्ताधारी गटातील काही असंतुष्ट नगरसेवकांचे समर्थन घेण्याचा डाव त्यांनी रचला असला, तरी खुद्द आमदार डिकॉस्ता हे इच्छुक नसल्याने पालिकेत नगराध्यक्षा बदलण्याच्या हालचाली थंडावल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
केपे पालिकेत 13 नगरसेवक असून यापैकी 9 नगरसेवक माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या गटातील असल्याने भाजपने पालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता स्थापना केली होती. तसेच यावेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव असल्याने आणि सत्ताधारी गटात दोन नगरसेविका असल्याने पाच वर्षे दोघांना नगराध्यक्षपद देण्याचा अलिखीत समझोता झाला असल्याची माहिती मिळाली होती.
विधानसभा निवडणुकीत केपे मतदारसंघातून काँग्रेसचे डिकॉस्ता हे विजयी होताच पालिकेतील काँग्रेस नगरसेवकांना सत्तापरिवर्तनाचे वेध लागले होते. सत्तास्थापनेकरिता हवे तसे बळ नसल्याने सत्ताधारी गटातील काही असंतुष्ट नगरसेवकांचे समर्थन मिळवण्याच्या तयारी सुरू झाल्या असल्या, तरी पालिकेत सत्ता स्थापन करण्याकरिता तीन नगरसेवकांची गरज आहे व भाजप सरकार राज्यात सत्तेवर असल्याने पालिकेत काँग्रेसची सत्ता स्थापन करणे अशक्मय बनले आहे. तसेच काँग्रेस पक्षात तीन नगरसेविका असल्याने त्यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्मयता आहे.
काँग्रेसला तीन नगरसेवकांची गरज
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात भाजप सरकार असताना पालिकेतील सत्ताधारी गटातील काही असंतुष्ट नगरसेवक काँग्रेस गटाला सत्ता स्थापना करण्याकरिता सहकार्य करत असले, तरी नगराध्यक्षपद महिलांकरिता राखीव असल्याने त्याचा जास्त फायदा काही होण्याची शक्मयता नाही. त्यामुळे व सत्ता स्थापना करण्याकरिता आणखी तीन नगरसेवकांची गरज असल्याने आमदार डिकॉस्ता फार इच्छुक नसल्याचे दिसत आहे. राज्यात भाजप सरकार असताना पालिकेतील सत्ता काँग्रेसकडे आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा फटका येणाऱया दिवसांत त्यांनाही बसू शकतो. कारण केपे मतदारसंघात विकास साधायचा असल्यास त्यांना भाजपकडे जवळीक ठेवणे गरजेचे आहे. याची जाणीव डिकॉस्ता यांना असल्याने त्यांना केपे पालिकेत सत्ता स्थापन करण्यात जास्त रस नसल्याचे दिसून येते.
मात्र नगराध्यक्षपदाची माळ गळय़ात पडावी याकरिता काही नगरसेविकांकडून डिकॉस्ता यांच्यावर दबाव आणला जात आहे व काँग्रेस समर्थक, कार्यकर्त्यांनी त्यासाठी बराच जोर लावलेला असल्याची माहिती मिळाली आहे. पालिकेतही सत्ताबदल करा अशी डिकॉस्ता यांच्याकडे मागणी होत आहे. परंतु आपल्याकडे हवे तसे संख्याबळ नाही व भाजपातील असंतुष्ट नगरसेवक कितपर्यंत साथ देतील याची जाणीव डिकॉस्ता यांना आहे. त्यामुळे त्यांना पालिकेत परिवर्तन घडविण्यात जास्त रस नसल्याने सध्या तरी पालिकेत बदल होण्याची शक्मयता मावळली आहे व भाजपच्या सुचिता शिरवईकर याच नगराध्यक्षपदी राहतील असे दिसत आहे.