जिल्हय़ाच्या सीमेवर अधिक खबरदारी
प्रतिनिधी /बेंगळूर
केरळमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाबरोबरच झिका व्हायरसचेही रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केरळला लागून असलेल्या मंगळूर जिल्हय़ाच्या सीमेवर अधिक खबरदारी घेतली जात आहे. येथे विविध ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले असून केरळमधून येणाऱया प्रत्येकाची तपासणी केली जात आहे.
गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सोमवारी रात्री दिलेल्या सूचनेनंतर केरळ आणि महाराष्ट्र सीमेलगत असणाऱया कर्नाटकातील जिल्हय़ांमध्ये चेकपोस्टवरील पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. मंगळूर जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात आहे. मात्र, केरळमध्ये झिका व्हायरस आणि कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमार्फत कर्नाटकात संसर्ग वाढू नये यासाठी मंगळूर कमिशनरेट हद्दीतील सर्व ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्त्वाखाली 4-5 पोलीस तीन पाळीमध्ये काम करत आहेत. आरोग्य कर्मचाऱयांच्या मदतीने तपासणी, स्वॅबही जमा केले जात आहेत.