पत्नीसमोरच घेतला जीव – शरीरावर 50 हून अधिक वार
वृत्तसंस्था / पलक्कड
केरळच्या पलक्कडमध्ये सोमवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका स्वयंसेवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 27 वर्षीय संजीतची त्याच्या पत्नीसमोरच चाकूंनी वार करत हत्या करण्यात आली. संजीत स्वतःच्या पत्नीला तिच्या कार्यालयात सोडण्यासाठी जात असताना हा प्रकार घडला आहे. हत्येची माहिती कळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. तर भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱयांनीही घटनास्थळी धाव घेतली.
ही घटना मांबरम भागात घडली आहे. संजीतच्या हत्येमागे इस्लामिक संघटना पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाची (पीएफआय) राजकीय शाखा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) कार्यकर्त्यांचा हात असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर फरार आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गाडीला दिली धडक
एलापल्ली येथील रहिवासी असलेला संजीत स्वतःच्या पत्नीसोबत जात असताना हल्लेखोरांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान कारमधून पाठलाग करणाऱया हल्लेखोरांनी संजीतच्या दुचाकीला धडक दिली. संजीत जमिनीवर कोसळताच त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले.
भाजपकडून आरोप
संघ स्वयंसेवकाच्या हत्येची निंदा करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्र यांनी कटांतर्गत ही हत्या घडवून आणली गेल्याचा आरोप केला आहे. राज्यात अशाप्रकारच्या घटना होण्यासाठी पोलीस आणि राज्य सरकारचे अपयश कारणीभूत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर पोलिसांनुसार संजीतच्या शरीरावर 50 हून अधिक घाव आढळले आहेत. त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. तर भागातील तणावाची स्थिती पाहता अतिरिक्त पोलीस दल तैनात करण्यात आले आहे.