स्मार्ट सिटी कामाच्या दर्जाचा मुद्दा ऐरणीवर
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत निर्माण करण्यात आलेली कामे व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यापाठोपाठ आता काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या कॉलेज रोडवरदेखील भेगा पडण्यास प्रारंभ झाला आहे. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्ची घालून करण्यात आलेला रस्ता खराब झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे कामाच्या दर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोटय़वधीची विकासकामे शहरात राबविण्यात येत आहेत. पण सदर विकासकामे घिसाडघाईने करण्यात येत असल्याने निकृष्ट दर्जाची होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कॉलेज रोडच्या काँक्रिटीकरणासाठी कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. कॉलेज रोडच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करून उर्वरित कामे करीत असताना काही ठिकाणी भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील प्रमुख मार्ग असून खानापूर, गोवा, कारवार आणि दक्षिण भागातील शहरांना ये-जा करणारी अवजड वाहने या रस्त्याचा वापर करीत असतात. तसेच सतत बसफेऱया असतात. त्यामुळे कॉलेज रोड सातत्याने खराब होत असतो. त्यामुळे या रस्त्याचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण दीड वर्षापूर्वी करण्यात आले आहे. पण हा रस्ता खराब होण्यास प्रारंभ झाला आहे. सध्या लॉकडाऊनमुळे रस्ता बंद असल्याने वाहनांची वर्दळ कमी आहे. पण या रस्त्यावर भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शहापूर खडेबाजार रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने असंख्य व्यावसायिकांचे नुकसान झाले. अशातच आता कॉलेज रोडवर भेगा पडल्याचे आढळून आल्याने स्मार्ट सिटीच्या कामाच्या दर्जाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.