वार्ताहर / अथणी :
कोकटनूर (ता. अथणी) येथे कृषी महाविद्यालयास मंजुरी मिळाली असून या महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 125 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी दिली.
अथणी येथील प्रवासी मंदिरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्णत्वास आले असून लवकरच याचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. अथणी, कागवाड व कुडची विधानसभा मतदारसंघातील वाहनधारकांसाठी अथणी येथे आरटीओ कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. प्रारंभी सदर कार्यालय भाडोत्री जागेत सुरू होणार असून लवकरच स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे.
संपूर्ण देशात एकच वाहन कर लागू करण्यात यावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपली चर्चा झाली असून लवकरच याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. यासह जेवरगी-संकेश्वर या राज्य महामार्गाच्या कामासदेखील लवकरच सुरुवात करण्यात येणार असून या विकासकामांसाठी अथणी व कागवाडच्या आमदारांना सोबत घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.