प्रतिभा कधीच लपून राहत नसल्याचे बोलले जाते. हे विधान खरे करून दाखविले आहे ब्राझीलची 16 वर्षीय बॅले डान्सर व्हिक्टोरिया बुएनोने. जन्मापासूनच हात नसलेल्या व्हिक्टोरियाने स्वतःच्या नृत्याद्वारे जगभरातून वाहव्वा मिळविली आहे. कोटय़वधींच्या संख्येत लोक तिच्या चित्रफिती पाहून नृत्य शिकत आहेत. जन्मापासून हात नसूनही तिने बॅले डान्स होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करून दाखविले आहे.
समाजमाध्यमांवर अधिराज्य
व्हिक्टोरिया ब्राझीलच्या मिनास ग्रेरॅस भागातील रहिवासी आहे. व्हिक्टोरिया लहानपणापासूनच नृत्यात तरबेज होती. तिच्या फिजियोथेरपिस्टने तिची ही कला आणि निर्धार पाहून बॅले डान्सर होण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून व्हिक्टोरियाने कधीच मागे वळून पाहिले आणि आज ती समाजमाध्यमांवर अधिराज्य करत आहे. व्हिक्टोरियाचे इन्स्टाग्रामवर दीड लाख फॉलोअर्स असून ती स्वतःच्या चित्रफिती प्रसारित करून स्वतःचा कलाविष्कार जगासमोर सादर करते. या चित्रफितींना इन्स्टाग्रावर उदंड प्रतिसाद मिळत असून लोकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माझ्यासाठी हात केवळ तपशील
केवळ 16 वर्षांच्या असलेल्या व्हिक्टोरियाने स्वतःचे पूर्ण लक्ष नृत्यावर केंद्रीत केले असून ती जाज या नृत्यप्रकाराचाही आनंद घेते. व्हिक्टोरिया आता मिनास ग्रेरॅस येथील बॅले अकॅडमीत जाते. ‘माझ्यासाठी हात केवळ एक तपशील आहे, मी स्वतःच्या डोळय़ांचा अनुनय करते’ असे उद्गार तिने काढले आहेत. लाकडी रंगमंचावर व्हिक्टोरिया जेव्हा स्वतःच्या साथीदारांसह नृत्यकौशल्य सादर करते, तेव्हा कुणालाच तिला हात नसल्याची जाणीव होत नाही. लोक केवळ मंत्रमुग्ध होऊन तिचे नृत्य पाहतात.
पायांनी सामानाची खरेदी
नृत्याद्वारे स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासह व्हिक्टोरियाने शारीरिक बळ आणि लवचिकता प्राप्त केल्याने तिच्यासाठी ते उपयुक्त ठरले आहे. सुपरमार्केटमध्ये जात व्हिक्टोरिया स्वतःच्या पायांनी सामानाची खरेदी करते. स्वतःच्या दिव्यांगतेवर मात करत आम्हाला आमच्या स्वप्नांची पूर्तता करावी लागणार असल्याचा संदेश तिने अन्य लोकांना दिला आहे.