निवृत्त लेफ्टनंट जनरल शोएब यांचे उद्गार – मोदींशी तुलना करणे चुकीचे
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाजूने दिसून येणारे सैन्याचे माजी अधिकारीही आता त्यांना तीव्र विरोध करू लागले आहेत. इम्रान खान यांच्या विदेश धोरणावरच प्रश्न उपस्थित होत आहेत. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अमजद शोएब यांनी इम्रान यांना नाकारलेला तसेच कुचकामी ठरविले आहे. पण या माजी सैन्याधिकाऱयाने जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदचा बचाव केला आहे.
अमजद शोएब हे पाकिस्तानसाठी ओळखीचे नाव आहे. शोएब हे स्वतःचे युटय़ूब चॅनेलही चालवतात. यापूर्वी ते उघडपणे इम्रान आणि सैन्याचा बचाव करत होते.
अमेरिकेने हाफिज सईदच्या विरोधात इनाम घोषित केले, पाकिस्तानात स्वतःचा हस्तक रेमंड डेव्हिसला पाठविले, त्याच्या माध्यमातून अमेरिका मुंबई हल्ल्यातील हाफिजच्या सहभागाचे पुरावे प्राप्त करू पाहत होता, पण त्यांना काहीच मिळाले नाही. हाफिज सईदचे प्रकरण भारताच्या दबावामुळे जिवंत ठेवले जात असल्याचे शोएब यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी अमेरिकेने संशयाच्या आधारावर हबीब बँकेच्या सर्व व्यवहारांवर बंदी घातली, पण अडचणी देशात आहेत. हबीब बँक आणि अन्य संघटनांवर अमेरिकेत कारवाई होते, पण पाकिस्तानात होत नाही. आम्ही कुणालाच शिक्षा केलेली नाही. पाकिस्तानच्या बेपर्वाईचा हिशेबच देता येत नसल्याचे शोएब म्हणाले.
कुचकामी व्यक्तीच्या हातात सत्ता
सत्ता एका नाकारलेल्या तसेच कुचकामी व्यक्तीच्या हातात देण्यात आल्याचे सत्य आहे. देशासाठी काम करणाऱया नेत्याला स्वतःचा वैयक्तिक अजेंडा किंवा जात नसते. तो आगामी पिढय़ांसाठी काहीतरी करू इच्छितो. पाकिस्तानची मुत्सद्देगिरी सपशेल अपयशी ठरली आहे. इम्रान खान यांना काहीच माहिती नसते. अशा व्यक्तीची तुलना नरेंद्र मोदींशी कशी करता येणार असे उद्गार त्यांनी काढले आहेत.