चौघे मृत बागलकोट जिल्हय़ातील अगसनकोप्पचे : मिनी बस-दुचाकीमध्ये अपघात
प्रतिनिधी/ बेंगळूर
मिनी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघांची स्थिती गंभीर आहे. ही घटना कोप्पळ जिल्हय़ाच्या कुकनूर तालुक्यातील निट्टाली क्रॉसजवळ शुक्रवारी घडली. दुचाकी चालक संतोष (वय 22, रा. बेणकल), भीमव्वा गोडी (वय 70), रंगप्पा नागन्नवर (वय 80) आणि शिवानंदप्पा (वय 60, सर्व राहणार अगसनकोप्प, जिल्हा बागलकोट) अशी मृतांची नावे असून एकाची ओळख पटलेली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, अगसनकोप्प येथील 22 जण साखरपुडय़ाच्या कार्यक्रमासाठी कोप्पळ जिल्हय़ातील हिरेसिंदोगी येथे मिनी बसमधून जात होते. दरम्यान, सदर बस निट्टाली क्रॉसजवळ आली असता समोरून वेगाने येणाऱया दुचाकीला चुकविण्याच्या प्रयत्नात बस उलटली. यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वारही या अपघातात ठार झाला. घटनास्थळी कुकनूर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला.