वार्ताहर/ कोयनानगर
हेळवाक (ता. पाटण) येथील रेशन दुकानातून वितरित केलेल्या तांदळात युरिया खत आढळल्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पाटणच्या पुरवठा अधिकाऱयांनी कोयना परिसरातील रेशन दुकानांना भेट देऊन चौकशी केली.
डिसेंबर महिन्यात हेळवाक येथील रेशनिंग दुकानातून वितरित केलेल्या तांदळाच्या पोत्यात युरिया खत सापडल्याचे वृत्त 1 जानेवारी रोजी ‘तरुण भारत’मध्ये छापून आले होते. या पार्श्वभूमीवर पाटणचे पुरवठा अधिकारी प्रफुल जाधव यांनी सोमवार 2 रोजी कोयना परिसरातील रेशन दुकानांना भेटी देऊन चौकशी केली. यावेळी हेळवाक येथील एकाच तांदळाच्या पोत्यात युरिया खत असल्याचे आढळून आले असून हे पोते रेशन दुकानदार रवींद्र गुरव यांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित ग्राहकाला दुसरे धान्य देण्यात येईल. त्याचबरोबर युरिया खत असणारे तांदळाचे पोते कुठून आले याची चौकशी करणार असल्याचे पुरवठा अधिकारी प्रफुल जाधव यांनी सांगितले.