प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली असल्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठय़ात प्रतिसेकंद 30 हजार 65 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासांत नवजा येथे 206 मिलिमीटर, कोयना येथे 138 तर महाबळेश्वर येथे 115 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. परिणामी धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ सुरू होऊन अवघ्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीपातळीत तब्बल सात फुटांनी वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळनंतरही पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम होता.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार कोयना पाणलोट क्षेत्रात चोवीस तासांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली असून कोयना परिसरासह संपूर्ण पाटण तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढायला सुरवात केली आहे. या तुफानी पावसामुळे पाणलोट क्षेत्रातून प्रतिसेकंद 30 हजार 65 क्युसेक पाण्याची आवक कोयना जलाशयात सुरू झाली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाटय़ाने होत आहे. गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीपातळीत सात फुटांनी वाढ झाली असल्याने बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणातील पाणीसाठा 19.04 टीएमसी इतका झाला आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे 138 (724) मिलिमीटर, नवजा येथे 206 (933) मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 115 (885) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. धरणाची पाणीपातळी 2046 फुटांवरून 2053 फूट इतकी वाढली आहे तर धरणातील पाणीसाठा 19.04 टीएमसी इतका झाला आहे.
दरम्यान, गेल्या चोवीस तासांपासून संपूर्ण तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपायला सुरवात केल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिसरातील ओढे, नाले भरून वाहात असल्याने तालुक्यातील कोयना, मोरणा, केरा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. परिणामी पिण्याच्या पाण्याचा रंगही बदलला आहे.
sंपूर्व भागात पावसाची प्रतिक्षा
सातारा ः कालपासून जिह्याच्या पश्चिम भागात पावसाने जोर दिला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने धुवॉधार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पहाटेच्या सुमारास प्रतापगडकडे जाणाऱया रस्त्यावर दरड कोसळण्याचा प्रकार घडला आहे. जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफची टीम तैनात केली आहे. तर पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतिक्षा आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सातारा जिह्यात महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई या तालुक्यात पावसाने मंगळवारपासून दमदार सुरुवात केली आहे. पावसाच्या आगमनामुळे काहीअंशी सातारा जिह्यातील पश्चिम भागातील शेतकरी सुखावला आहे. पुर्व भागात कोरेगाव, फलटण, खंडाळा, माण, खटाव या तालुक्यात अद्यापही पाऊस झालेला नाही.
तहसील कार्यालयात नैसर्गिक आपत्ती कक्ष स्थापन
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाचा नंबर 1077 आहे.