शाळेत जाऊ शकणार नाहीत 1 कोटी मुलं : जगभरात 1 कोटी 30 लाख 62 हजार 360 कोरोनाबाधित
कोरोना विषाणूने जगभरात कहर माजविला आहे. कोटय़वधी लोकांना याची बाधा झाली असून लाखो जणांना जीव गमवावा लागला आहे. महामारीने अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान करत मुलामुलींच्या भविष्याला अंधारात टाकले आहे. मुलांसाठी काम करणारी संस्था सेव्ह द चिल्ड्रनने यासंबंधी एक अहवाल तयार केला आहे.
1.6 अब्ज मुलांची ‘शाळा’ हुकली
एप्रिल 2020 मध्ये जगभरात 1.6 अब्ज मुलांना शाळा तसेच विद्यापीठात जाता आलेले नाही. जगातील एकूण विद्यार्थ्यांच्या 90 टक्के इतके हे प्रमाण आहे. मानवी इतिहासात पहिल्यांदा मुलांच्या एका पूर्ण पिढीचे शिक्षण अंधकारात सापडले आहे. महामारीमुळे आर्थिक संकट निर्माण होऊन आगामी काळात शाळांच्या प्रवेशावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.
भवितव्य अंधकारमय
सेव्ह द चिल्ड्रनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंगेर एशिंग यांच्यानुसार सुमारे 1 कोटी मुले कधीच शाळेत परतू शकणार नाहीत. सरकारने त्वरित शिक्षणक्षेत्रात गुंतवणूक करण्याची गरज आहे. शाळा पुन्हा सुरू झाल्यावर शिक्षणासाठीची गुंतणूक वाढविली जावी आणि तोपर्यंत दूरस्थ शिक्षणाला चालनादेण्यात यावी असे आवाहन सेव्ह द चिल्ड्रनने केले आहे.
शिक्षणाकडे दुर्लक्ष
कोरोना महामारीमुळे गरीब मुलांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अर्ध्या वर्षापासून दूरस्थ शिक्षण किंवा कुठल्याही प्रकारचे शिक्षण त्यांना उपलब्ध झालेले नाही. संकटावर वेळीच उपाययोजना न केल्यास मुलांच्या भविष्यावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम दिसून येणार आहे.
12 देशांमध्ये सर्वाधिक धोका
संस्थेनुसार नायजर, माली, चाड, लायबेरिया, अफगाणिस्तान, गिनी, मॉरिटानिया, येमेन, नायजेरिया, पाकिस्तान, सेनेगल आणि आयव्हरी कोस्ट या देशांना सर्वाधिक धोका आहे. महामारी सुरू होण्यापूर्वीही सुमारे 26 कोटी मुले शिक्षणापासून वंचित होती. कोरोना संकटामुळे शिक्षण प्राप्त होत असलेल्या मुलांकडूनही हा हक्क हिरावला जाऊ शकतो.
कोटय़वधी मुले दारिद्रय़ात
अहवालानुसार 9 ते 11 कोटी मुलांना दारिद्रय़ाच्या विळख्यात जावे लागू शकते. तसेच शिक्षण सोडून कमी वयात नोकरी सुरू करण्याची वेळ येऊ शकते. अशा स्थितीत मुलींचा विवाह लवकर लावून दिला जाईल आणि सुमारे 1 कोटी विद्यार्थी कधीच शिक्षणाकडे परतू शकणार नाहीत. कनिष्ठ आणि मध्यम उत्पन्नगटातील देशांमध्ये 2021 च्या अखेरपर्यंत शिक्षणाच्या तरतुदीत 77 अब्ज डॉलर्सची घट होणार आहे.
कोविड पार्टी जीवावर बेतली
अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये ‘कोविड पार्टी’त सामील होणाऱया 30 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. ही पार्टी एका बाधिताकडून आयोजित करण्यात आली होती. संबंधित इसमाने कोरोनाची अफवा समजून पार्टीत भाग घेतला होता. एखाद्या बाधिताने पार्टी आयोजित करून त्यात मित्रांना बोलाविणे अत्यंत चुकीचे असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय अधिकाऱयाने व्यक्त केली आहे.
मास्क न वापरणाऱयांवर कारवाई
ब्राझीलमध्ये मास्क न वापरणाऱया लोकांच्या विरोधात कारवाई केली जत आहे. रियो डे जेनेरियो शहरात मास्कशिवाय दिसून येणाऱया लोकांना पोलिसांकडून दंड ठोठावला जात आहे. घरातून बाहेर पडल्यावर मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. कोरोना संसर्गाप्रकरणी ब्राझील दुसऱया स्थानावर आहे. साओ पावलोमध्ये सर्वाधिक 1 लाख 30 हजार बाधित सापडले असून 11,415 जणांचा मृत्यू झाला आहे.
सैनिकांची संख्या वाढविली जाणार
कोरोना संसर्ग रोखण्याकरता ऑस्ट्रेलियाचे सरकार अधिक संख्येत सैनिक तैनात करणार आहे. व्हिक्टोरिया प्रांतात 1 हजार अतिरिक्त सैनिक तैनात केले जाणार आहेत. मागील काही दिवसांपासून प्रांतात अधिक संख्येत नवे रुग्ण सापडत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. व्हिक्टोरिया प्रांतात दिवसभरात 177 नवे बाधित सापडले आहेत.
मेक्सिकोत संकट कायम
मेक्सिकोत बळींचा आकडा आता इटलीपेक्षा अधिक झाला आहे. देशात 35,006 बळी गेले असून 2,99,750 जणांना संसर्ग झाला आहे. काही आठवडय़ांपूर्वी टाळेबंदी शिथिल करण्यात आल्यापासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. देशात महामारी कमकुवत होत चालली असून प्रसारमाध्यमे विनाकारण भीती पसरवत असल्याचा दावा अध्यक्ष एंड्रेस लोपेझ यांनी केला आहे.
मादागास्कर : खासदारांचा मृत्यू
मादागास्करमध्ये कोरोना महामारीमुळे दोन खासदारांना जीव गमवावा लागला आहे. तर आणखीन 14 खासदारांना हा संसर्ग झाला आहे. देशाची राजधानी एंटानानारिवोमध्ये दोन महिन्यांनी टाळेबंदी हटविण्यात आली होती. परंतु रुग्ण वाढू लागल्याने 5 जुलै रोजी पुन्हा टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. देशातील जनतेवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
बोलिविया : अर्थमंत्र्यांना लागण
बोलिवियाच्या अर्थमंत्री ऑस्कर ऑरिट्ज यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील 4 दिवसांमध्ये संसर्ग झालेल्या ऑरिट्ज देशाच्या चौथ्या नेत्या ठरल्या आहेत. यापूर्वी अंतरिम अध्यक्षा जेनिन ऐनेज यांचा चाचणी अहवाल होकारात्मक आला होता. याचबरोबर आरोग्यमंत्री इडी रोका, खाणमंत्री जॉर्ज फर्नांनडो आरोपेजा आणि मंत्री येर्को नुनेज नेग्रेट्टे यांनाही लागण झाली आहे. बोलिवियात आतापर्यंत 47 हजार 200 रुग्ण सापडले असून 1,754 जणांचा बळी गेला आहे.