वार्ताहर/ किणये
मंगळवारपासून बेळगावात लॉकडाऊन होणार की काय, या भीतीपोटी ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्येही नागरिकांची गर्दी दिसून आली. जीवनावश्यक साहित्य व भाजीपाल्याची खरेदी करताना नागरिक दिसत होते. मात्र बेळगावात अद्यापही लॉकडाऊन घोषित करण्यात आलेले नाही.
मंगळवारपासून बेळगाव लॉकडाऊन होणार का, याबाबत गेल्या दोन दिवसापासून चर्चा सुरू होती. मात्र सोमवारी जिल्हाधिकाऱयांनी बेळगावमध्ये लॉकडाऊन करण्याची गरज नाही, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे बेळगावात सध्यातरी लॉकडाऊन घोषित करण्यात आला नाही. पण लॉकडाऊन झाल्यास जीवनावश्यक साहित्य मिळणे अवघड होईल, यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील पिरनवाडी, हिंडलगा रोड, कंग्राळी खुर्द, कडोली, सांबरा मच्छे आदी ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमध्ये सोमवारी नागरिकांची गर्दी मोठय़ा प्रमाणात दिसून आली.
किराणा दुकान, भाजीपाला दुकान व अन्य दुकानांमध्येही ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच बँकामध्येही गर्दी जाणवली.
कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने ग्रामीण भागातील जनताही भयभीत झाली आहे. मात्र बाजारपेठांमध्ये नागरिक सामाजिक अंतराचे भान राखत नसल्याचे अधिक प्रमाणात दिसून येत आहे..