प्रतिनिधी / पेठ वडगाव
वडगाव पालिका प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना खबरदारी घेतल्या आहेत. कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी व्यापारी व्यावसाईकांची जनजागृती व शिस्त लागण्यासाठी व्यापारी – व्यावसाईकांना पालिका प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी घेत असल्याबाबत शपथ देण्यात आली. तर व्यावसाईकांची आरोग्य तपासणीही पालिकेच्या बळवंतराव यादव हॉस्पिटल यांचेवतीने करण्यात आली.
पेठ वडगाव शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध उपाययोजना दक्षता घेतल्या आहेत. पालिकेचा प्रत्येक कर्मचारी आपले दैनंदिन काम बाजूला ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीच्या उपाययोजनामध्ये सामील झाला आहे. स्वच्छता कर्मचारी शहरात चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत. मुख्याधिकारी सुषमा कोल्हे यांनी शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना व दक्षता घेत परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली आहे. शहरात वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे व पोलीस कर्मचारी नागरिकांना गर्दी करण्यापासून रोखत आहेत.
प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देवून दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या दुकानदाराना पालिका प्रशासनाने शासनाने घालून दिलेल्या नियम व अटी पालन करण्याबाबत सूचना देवून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या बाबत सूचना दिल्या आहेत. कोरोना संसर्गापासून बचावासाठी जनजागृती करत असताना आज पालिकेने दुकानदार – व्यावसाईकांना प्रशासनाच्या सूचनांची अमलबजावणी करून दक्षता घेण्याबाबत शपथ घेतली. याला व्यापारी व्यावसाईकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नियम व अटी, सूचनांचे पालन करून कोरोनाचा संसर्ग फैलावेल असे कोणतेही बेजबाबदार कृत्य करणार नाही अशी हमी दिली. तर कोरोनाच्या लढ्यात पालिका प्रशासनास सहकार्य करण्याची हमी यावेळी व्यापारी – व्यावसाईकांनी दिली.