जागतिक आरोग्य संघटनेचे विधान : विषाणूच्या नव्या स्ट्रेनवरही लस प्रभावी ठरणार
ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या स्वरुपासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेने विधान केले आहे. म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन ही कुठल्याही विषाणूची प्रक्रिया सामान्य असल्याने या नव्या स्वरुपाला घाबरण्याची गरज नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
लस सक्षम
या मुद्दय़ावर पारदर्शकता असणे अत्यंत आवश्यक आहे. विषाणूचे म्युटेशन ही सामान्य प्रक्रिया आहे, आम्ही या विषाणूवर अत्यंत बारकाईने नजर ठेवत आहोत असे उद्गार डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन कार्यक्रमाचे प्रमुख माइक रेयान यांनी काढले आहेत. कोरोनाच्या विरोधात विकसित करण्यात आलेली लस या नव्या स्ट्रेनला रोखण्यासही सक्षम आहे, परंतु हे सुनिश्चित करण्यासाठी सध्या परीक्षण सुरू असल्याचे डब्ल्यूएचओच्या पदाधिकाऱयांनी सांगितले आहे.
घातक मानण्यास नकार
डब्ल्यूएचओने या विषाणूला कोरोना विषाणूच्या पूर्वीच्या स्ट्रेनपेक्षा घातक मानण्यास नकार दिला आहे. ब्रिटनची आकडेवारी पाहता हा स्ट्रेन अधिक संख्येत लोकांना आजारी करत आहे की घातक असल्याचे कुठलेच पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु हा सहजपणे फैलावत असल्याचे दिसून येत असल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
संक्रमणाचा वाढता वेग
प्रवासावर अंकुश लावणारे देश जोखिमीचे आकलन करून खबरदारीचे पाऊल उचलत आहेत. हा विवेकपूर्ण निर्णय आहे, परंतु कोरोना विषाणूत झालेले हे उत्परिवर्तन सामान्य प्रक्रिया असल्याचे प्रत्येक जण जाणतो. कोरोना विषाणूचे उत्परिर्वन आतापर्यंत इन्फ्लुएंजाच्या तुलनेत खूपच मंद होते आणि ब्रिटनमध्ये आढळलेला नवा स्ट्रेनही अन्य आजारांच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात फैलावत असल्याचे रेयान म्हणाले.
विस्तृत माहिती लवकरच
विषाणूची अनेक उत्परिवर्तने आणि परिवर्तने आम्ही पाहिले आहेत. हे उत्परिवर्तन सद्यकाळात वापरण्यात येत असलेल्या वैद्यकीय उपचार, औषधे किंवा लसीकरणासाठी विषाणूच्या संवेदनशीलतेवर कुठलाही महत्त्वाचा प्रभाव टाकत नाही. अशा स्थितीत तो लवकरच संपूही शकतो. अत्याधिक संक्रमणयुक्त या विषाणूच्या प्रभावासंबंधी काही दिवस किंवा आठवडय़ांमध्ये चित्र स्पष्ट होऊ शकते, असे उद्गार डब्ल्युएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी काढले आहेत.