शुक्रवारी दोन नवे रुग्ण
प्रतिनिधी / पणजी
राज्यात उपचार घेणाऱया कोरोनाच्या 45 रुगणांपैकी 9 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना काल शुक्रवारी मडगावच्या कोविड इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे 36 रुग्ण राहिले असून काल शुक्रवारीच त्यात आणखी दोघांची भर पडल्याने सध्या उपचार घेणाऱया रुग्णांची संख्या 38 झाली आहे. यापुर्वी दीड महिन्यापूर्वी बरे झालेले 7 आणि शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आलेले 9 मिळून आतापर्यंत 16 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 54 झाली आहे.
काल शुक्रवारी आणखी दोन रुग्ण सापडले, ते गाडीतून मुंबईहून गोव्यात आले आहेत. यापैकी एक महिला आहे. काल शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आलेल्या 9 जणांना आणखी 7 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर घरी आणखी 14 दिवस ‘गृह विलगीकरण’मध्ये ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी अन्य तीन रुग्ण ट्रु नेट चाचणीत पॉझिटिव्ह आढळले, ते मुंबईहून बसद्वारे गोव्यात आले आहेत. सध्या बस आणि रेल्वेतून येणारे प्रवासी गोव्यासाठी धोकादायक ठरत आहेत. गोव्यात कोरोनाबाधित रुग्ण हे आयात केलेले बाहेरचे आहेत.
विमान प्रवाशांची होणार रेपीड चाचणी
गोव्यात येणाऱया विमान प्रवाशांची रेपीड चाचणी किंवा एन्टी बॉडी टेस्ट करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी इंडियन काऊन्सील ऑफ मेडिकल रिसर्चकडे केली आहे. विमानातून येणाऱया प्रवाशांना या दोन चाचण्या करण्यास गोवा सरकारला मान्यता द्यावी, असे राणे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
काल आणखी 503 टेस्ट करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवासी ज्यांना क्वारंटाईन केले आहेत, त्यांची संख्या 409 आहे. एकूण 873 जण क्वारंटाईनमध्ये आहेत. यापैकी 586 हे खलाशी आहेत.
दक्षिण आफ्रीकेतून 46 खलाशी गोव्यात
दक्षिण आफ्रीकेतून गोव्यातील 46 खलाशी काल शुक्रवारी मुंबईत दाखल झाले होते. कदंबच्या दोन बसगाडय़ा मुंबईला पाठविण्यात आल्या आहेत. या बसगाडय़ातून आज हे खलाशी गोव्यात पोचणार आहेत. विदेशातील मोठय़ा प्रमाणात खलाशी आतापर्यंत गोव्यात पोचले आहेत. त्याचबरोबर येत्या काळात आणखी खलाशी गोव्यात दाखल होतील.
………………………………………………..बॉक्स…………………………………………………
गोव्यातील एकूण कोरोनाबाधित 54
सध्या उपचार घेणारे कोरोनाबाधित 38
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 16
………………………………………………………………………………………………………………