उपचाराधीन रुग्णसंख्येत आणखी घट, मृत्यूसंख्येत मात्र वृद्धी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोनाचा भीषण उद्रेक शमण्याची सुचिन्हे दिसत असून सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळ या चोवीस तासांच्या काळात नव्या रुग्णांमध्ये 2 लाख 63 हजार 533 ची भर पडली आहे. गेले चार दिवस सातत्याने नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असून बरे होणाऱयांची संख्या वाढत आहे. याच चोवीस तासांमध्ये 4 लाख 22 हजार 357 रुग्ण बरे झाले असून मृत्यूसंख्या 4,329 अशी आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 33 लाख 53 हजार 765 इतकी आहे. या चोवीस तासांमधील नवी रुग्णसंख्या गेल्या चार आठवडय़ांमधील सर्वात कमी असल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. सलग दोन दिवस उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत एक लाखांहून अधिकची घटही दिसून आली आहे.
अनेक राज्यांमध्ये घट
एकंदर 27 राज्ये आणि केंदशासित प्रदेशांमध्ये रुग्ण घटले आहेत. चोवीस तासांमध्ये 18.69 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत. चाचण्यांची संख्या तेव्हढीच ठेवूनही रुग्णसंख्या घटत आहे, हे महत्वाचे मानण्यात येत आहे. पॉझिटिव्हीटी प्रमाणातही मोठी घट झाली असून ते आता 14.1 टक्के इतके आहे. सोमवारी हे प्रमाण 17.9 टक्के इतके असल्याचे दिसून आले होते.
काही देशांमध्ये वाढ
तैवान, थायलंड, व्हिएतनाम, मालदीव आदी आशियातील देशांमध्ये नव्याने रुग्णसंख्या वाढताना दिसून आली. या देशांच्या रुग्णसंख्येत गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका आदी पाश्चिमात्य देशांमधील रुग्णसंख्या आता बऱयाच प्रमाणात घटत आहे.