वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोनातून बरे झालेल्यांना संक्रमणातुन मुक्त झाल्याच्या 9 महिन्यांनी लस देण्यात यावी अशी शिफारस सरकारच्या समितीने केली आहे. लसीकरणाशी संबंधित राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समुहाने (एनटीएजीआय) हा सल्ला दिला आहे. यापूर्वी एनटीएजीआयने 6 महिन्यांनी लस देण्याची सूचना केली होती.
सल्लागार गटाने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवून 12-16 आठवडे करण्याची शिफारस केली होती. पूर्वी कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 4-8 आठवडय़ांचे हेते. तज्ञांच्या गटाने कालमर्यादेची समीक्षा करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही डाटांचा अभ्यास केल्याचे मानले जात आहे.
अँटीबॉडी वाढविण्यास मदत
संक्रमण होणे आणि पहिला डोस मिळण्यादरम्यान कालावधी वाढल्याने अँटीबॉडीचे प्रमाण वाढविण्यास मदत मिळू शकते असे गटाने म्हटले आहे. गरोदर आणि स्तनपान करेवणाऱया महिलांना लसीकरणासाठी पात्र मानले जावे अशी सूचना सल्लागार गटाने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरोनातून बरे होणे आणि लसीच्या पहिल्या डोसदरम्यान 6 महिन्यांचे अंतर सुरक्षित आहे.
लसीचा दुसरा डोस घेण्यापूर्वी कोरोनाची बाधा झाल्यास संबंधिताने संक्रमणातून बरे झाल्यावर 4-8 आठवडय़ांची प्रतीक्षा करावी असे एनटीएजीआयने यापूर्वी म्हटले हेते. मोनोक्लोनल अँटीबॉडी किंवा कान्वलेसन्ट प्लाझ्मा देण्यात आलेले रुग्ण डिस्चार्ज मिळाल्याच्या दिवसापासून तीन महिन्यांनंतर लसीकरण करवू शकतात असा सल्लाही देण्यात आला होता.
रुग्णालयात दाखल होणे किंवा आयसीयूत देखभालीची आवश्यकता असलेला अन्य कुठलाही गंभीर आजार असलेल्यांनी पुढील डोस घेण्यापूर्वी 4-8 आठवडय़ांपर्यंत प्रतीक्षा करावी असे सल्लागार गटाने मागील आठवडय़ात म्हटले होते. आरोग्य मंत्रालयाच्या मापदंडांनुसार कोरोना संक्रमणातून मुक्त झाल्यावर 4-8 आठवडय़ांनी लस घेतली जावी.