मुंबई शेअरबाजार निर्देशांकात 882 अंकांची घसरण ः निफ्टीही कमजोर
वृत्तसंस्था/ मुंबई
कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येमधील उच्चांकी वाढीमुळे शेअरबाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअरबाजार निर्देशांक सोमवारी 882 अंकांनी घसरून 47,949 अंकांवर बंद झाला आहे. याचप्रकारे राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांकात 258 अंकांनी घसरण होत 14,359 अंकांवर बंद झाला आहे.
मुंबई शेअरबाजार निर्देशांकात सामील 30 पैकी 28 समभागांमध्ये घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण पॉवर ग्रिडच्या समभागात झाली आहे. कंपनीचा समभाग 4.2 टक्क्यांनी कमजोर होत 201 रुपयांवर बंद झाला आहे. इंडसइंड बँक आणि ओएनजीसीचा समभागही 4 टक्क्यांपर्यंत कमजोर झाला आहे. तर डॉ. रेड्डीज आणि इन्फोसिसचा समभाग वधारला आहे.
बँकिंग अन् ऑटो समभागांना फटका
गुंतवणूकदारांनी सर्वाधिक विक्री बँकिंग आणि ऑटो क्षेत्रातील समभागांची केली आहे. निफ्टी बँक निर्देशांक 2.5 टक्के म्हणजेच 769 अंकांनी घसरून 31,208 वर आला आहे. याचप्रकारे ऑटो निर्देशांकही 2.8 टक्क्यांनी घसरला आहे. बीएसईवर 3,172 समभागांमध्ये व्यवसाय झाला असून यातील 2,195 समभागांमध्ये घसरण झाली ओ. तर 774 समभागांमध्ये वृद्धीची नोंद झाली ओ.
मोठय़ा घसरणीमुळे एक्सचेंजवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल कमी होत 201.75 लाख कोटी रुपयांवर आले आहे. शुक्रवारी हाच आकडा 205.23 लाख कोटी रुपये इतका होता. शुक्रवारी सेन्सेक्स 28.35 अंकांनी वधारून 48,832.03 अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी 36.40 अंकांनी तेजीत येत 14,617.85 अंकांवर स्थिरावला होता.
आशियाई शेअरबाजारांमध्ये तेजी
हाँगकाँगचा हेंगसेंग निर्देशांक 108 अंकांनी वधारून 29,117 अंकांवर बंद झाला आहे. चीनचा शांघाय कंपोजिट निर्देशांकही 50 अंकांच्या तेजीसह 3,477 अंकांवर बंद झाला आहे. कोरियाचा कोस्पी निर्देशांक 3,198 अंकांवर स्थिरावला आहे. ऑस्ट्रेलियाचा ऑल ऑर्डनरीज निर्देशांक 2 अंकांनी वधारून 7,328 अंकावर बंद झाला आहे. जपानचा निक्केई निर्देशांक 12 अंकांनी घसरून 29,671 अंकांवर आला आहे.
अमेरिकेच्या शेअरबाजारात तेजी
अमेरिकेतील शेअरबाजार शुक्रवारी तेजीसह बंद झाले होते. डाउ जोन्स 0.48 टक्क्यांच्या तेजीसह 164.68 अंकांनी वधारून 34,200,.70 अंकांवर बंद झाला होता. नॅस्डॅक 0.10 टक्क्यांच्या तेजीसह 14,052.30 वर बंद झाला होता. एसअँडपी निर्देशांकही 15.05 अंकांनी वधारून 4,185.47 अंकांवर बंद झाला होता. अशाचप्रकारे फ्रान्स आणि जर्मनीतील शेअरबाजारही तेजीसह बंद झाले आहेत.
एफआयआय अन् डीआयआय डाटा
एनएसईवरील प्रोव्हिजनल डाटानुसार 16 एप्रिल रोजी विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) 437.51 कोटी रुपयांचे तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) 657.55 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते.