देशात दिवसभरात 57,118 पॉझिटिव्ह : 764 जणांचा मृत्यू
विशाखापट्टणम / वृत्तसंस्था
देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला असून शनिवारी दिवसभरात 57 हजार 118 जणांची भर पडल्याने एकंदर पॉझिटिव्हची संख्या 17 लाखांसमीप पोहोचली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच मृतांची संख्याही 764 ने वाढली आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपर्यंत देशात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 95 हजार 988 इतकी झाली आहे. गेल्या तीन दिवसात 50 हजारांनी वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 60 हजारांच्या जवळ पोहोचली आहे. देशात सध्या 5 लाख 65 हजार 103 सक्रिया रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत 10 लाख 94 हजार 374 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारपर्यंत अखेरच्या चोवीस तासात 36 हजार 569 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
जुलैमध्ये 11 लाख कोरोनाबाधित
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत देशात 5 लाख 66 हजार 840 इतकी कोरोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक भर पडली आहे. फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये 11.1 लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच जुलै महिन्यात 19 हजार 122 जणांना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 36 हजार 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.