मुंबई / वृत्तसंस्था
यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी समालोचन पॅनेलमध्ये आपला पूर्ववत समावेश करावा, अशी मागणी माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर यांनी बीसीसीआयकडे केली. बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली व बीसीसीआय कार्यकारिणी सदस्यांशी याबाबत त्यांनी लेखी संपर्क साधला. यंदा 13 व्या आवृत्तीची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत होणार आहे. गतवर्षी विश्वचषक स्पर्धेदरम्यान रविंद्र जडेजाबद्दल आक्षेपार्ह टिपणी केल्यानंतर ते वादाच्या भोवऱयात सापडले होते.
संजय मांजरेकर यांचा यापूर्वी आयपीएल समालोचन पॅनेलमध्ये समावेश होता. पण, नंतर त्यांना अचानक डच्चू देण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मांजरेकर यांनी बीसीसीआयशी संपर्क साधला. आपण कोणाचे मन दुखावले असेल तर त्यांची माफी मागण्याची आपली तयारी आहे, असे मांजरेकर यांनी बीसीसीआयला कळवले.
‘मी मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यरत असेल. सरतेशेवटी आपण सर्व जण या बडय़ा उपक्रमात आपापल्या परीने वाटा उचलत असतो. समालोचन पॅनेलमधून डच्चू देण्यात आला, त्यामुळे, व्यावसायिक कारकिर्दीच्या दृष्टिकोनातून माझ्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण झाले. जर मी नकळत कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागू इच्छितो’, असे मांजरेकर आपल्या पत्रात म्हणाले.
भारतीय समालोचकांमध्ये तज्ञ समालोचक म्हणून ओळखल्या जाणाऱया संजय मांजरेकर यांना यंदा मार्च महिन्यात बीसीसीआयच्या समालोचन पॅनेलमधून वगळले गेले आहे. 54 वर्षीय मांजरेकर यांनी 37 कसोटी व 74 वनडे सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.