प्रतिनिधी/ तिसवाडी
देशभरात कोरोनाच्या फैलावामुळे भीतीचे वातावरण असताना ओल्ड गोवा येथील बासिलिका ऑफ बाँ जिजस चर्च व तेथील अन्य चर्च तसेच राज्यातील अन्य पर्यटनस्थळे 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. बॅसिलिका ऑफ बाँ जिजसच्या गेटवर याबाबत नोटीस लावण्यात आली आहे की, येथे पर्यटक व अन्य नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (एएसआय) गोव्यातील 21 वारसास्थळांना भेटी देण्यास बंदी घातली असून ती तातडीने लागू करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा परिणाम म्हणून आणि सावधगिरीचा उपाय म्हणून ही उपाययोजना हाती घेण्यात आली आहे. एएसआयने गोव्यातील 21 स्थळांना जागतिक वारसास्थळे म्हणून मान्यता दिली आहे. तेथे सातत्याने पर्यटक, स्थानिक लोक व इतर भेटी देत असतात. त्यात प्रामुख्याने परदेशी पर्यटकांचाही समावेश असतो. कोरोना विषाणूचा फैलाव वाढत असून तो रोखण्यासाठी तसेच त्यापासून वाचण्यासाठी तेथे भेटी देण्यास सर्वांना मनाई करण्यात आली आहे.
अनेकांनी तेथे भेटी देण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला असून त्यांना अजून भेटी करीता ऑनलाईन पद्धतीने अनुमती देण्यात आलेली आहे. ती सुद्धा रद्द करण्यात आल्याचे एएसआयने कळविले आहे. चित्रपट शुटिंग, फिल्मिंग, फोटोग्राफी, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध कामांसाठी उपरोक्त ठिकाणी आगावू आरक्षण करण्यात आले होते. ते स्थगित ठेवण्यात आले असून कोणालाही तेथे प्रवेश दिला जाणार नाही, असे एएसआयने स्पष्ट केले आहे. 21 पैकी 14 स्थळे ओल्ड गोवा येथे असून उर्वरित 7 स्थळे इतर ठिकाणी आहेत. तेथे आता 31 मार्च पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले