वृत्तसंस्था/ रियो डी जानेरिओ
संपूर्ण जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून आतापर्यंत पन्नास हजारहून अधिक बळी गेले आहेत. अमेरिकेसह ब्राझील, अर्जेन्टिना या देशात कोरोनाचा जोरदार प्रार्दुभाव झाला असल्याचे दिसून येत आहे. जागतिक यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हरतऱहेने प्रयत्न करत आहे. यामध्ये ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारनेही 10 लाख डॉलरचा निधी (7.6 कोटी रुपये) कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दिले आहेत. हा निधी युनिसेफ व ब्राझीलमधील एका चॅरिटेबल ट्रस्टला दिला जाणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. या चॅरिटेबल ट्रस्टने सध्याच्या घडीला कोरोनाग्रस्तांसाठी विलगीकरण कक्ष तयार केले असून हजारो नागरिकांना या ट्रस्टद्वारे अन्नाची पाकिटे दिली जात आहेत. ब्राझीलमध्ये सध्या कोरोनाने 400 हून अधिक लोकांचा बळी गेला असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, नेमारआधी फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो, लायोनेल मेस्सी, टेनिसपटू रॉजर फेडरर, नोव्हॅक जोकोविच, राफेल नदाल यांनी मदत केली आहे.